गडचिरोली : जिल्ह्यातील शिक्षकांच्या बदली प्रक्रियेसाठी जिल्ह्यातील अवघड क्षेत्रातील शाळा कोणत्या आणि सर्वसाधारण क्षेत्रातील शाळा कोणत्या याची नव्याने निश्चिती करण्यात आली आहे. ही यादी तात्पुरती आहे. त्यामुळे यावर कोणाला काही आक्षेप असल्यास तीन दिवसांच्या आत पुराव्यासह तो नोंदवावा, असे आवाहन जि.प. प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
अवघड आणि सर्वसाधारण क्षेत्र निश्चित करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली होती. संबंधित विभागाकडून त्यासाठी माहिती मा्गविण्यात आली. तसेच तालुक्यांच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून त्याची उलटतपासणी करण्यासाठीही माहिती मागविण्यात आली होती. जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र, स्थानिक स्थितीचा विचार करुन निकषांमध्ये आवश्यक ते बदल करण्याचे अधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीला दिलेले होते.
प्राथमिक शिक्षकांची सन 2018 व सन 2022 मध्ये ऑनलाईन बदली पोर्टलवर झालेली बदली प्रक्रिया, न्यायालयात दाखल याचिकांमध्ये न्यायालयाने दिलेले निर्देश, जिल्ह्यातील रिक्त पदांचा समतोल राखणे, शाळांमध्ये शिक्षकांची उपलब्धता होणे, तसेच भौगोलिक व स्थानिक परिस्थिती यांचा शाळांना स्वतः व पर्यवेक्षकीय यंत्रणेच्या मार्फतीने भेटी देऊन सविस्तर अभ्यास करुन संबंधित विभागाने माहिती सादर केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील शाळांची अवघड व सर्वसाधारण क्षेत्र निश्चित करण्यासाठी तात्पुरती यादी जिल्हा परिषदेच्या www.zpgadchiroli.org/in या संकेतस्थळावर, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
सदर यादीवर काही आक्षेप असल्यास संबंधित शिक्षकांनी यादी प्रसिद्धीच्या दिनाकांपासून 3 दिवसांच्या आत केंद्रप्रमुख यांचेमार्फत पुराव्यादाखल दस्ताऐवजासह आक्षेप सादर करता येईल. मोघम व अनावश्यक तर्कांच्या आधारे सादर केलेल्या आक्षेपांची दखल घेतल्या जाणार नाही. खोटी माहिती सादर केल्यास संबंधितावर शिस्तभंगाची कारवाई होणार आहे.
आक्षेपानंतर जिल्हास्तरीय समिती आवश्यक तो बदल करून अंतिम यादी प्रसिद्ध करेल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी कळविले.