देसाईगंज : दुचाकी वाहनांची चोरी करून ती विक्री करणाऱ्या आरोपी युवकाला देसाईगंज पोलिसांनी अटक केली. तरुण उर्फ तुषार राजू बुजेवार (22 वर्ष) असे त्याचे नाव असून येथील हनुमान वॅार्डमधील रहिवासी आहे. त्याच्याकडून चोरीतील दोन दुचाकी वाहने जप्त करण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार, देसाईगंज पोलिसांनी वाहन चोरीबाबात गुन्हा दाखल केलेला होता. पण त्यातील आरोपीचा शोध लागलेला नव्हता. तपास अधिकारी सपोनि संदीप आगरकर यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार तुषार बुजेवार याने आपल्या राहत्या घरी दोन चोरीतील दुचाकी लपवून ठेवलेले असल्याचे आणि ती वाहने तो कोणालातरी विकण्याच्या तयारीत असल्याचे कळले. त्यामुळे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पथकासह त्याचे घर गाठून त्याची चौकशी सुरू केली. मात्र आधी आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर त्याच्या घरात ठेवलेल्या दोन दुचाकींची कागदपत्रे त्याच्याकडे नव्हती. त्यामुळे दोन्ही दुचाकी (क्र. एम.एच.35 ए.एल.6170 आणि एम.एच.33 यु 3930) जप्त करण्यात आल्या. त्या वाहनांची अंदाजे किंमत 1 लाख 25 हजार रुपये आहे.
देसाईगंज न्यायालयाने त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. विशेष म्हणजे हा आरोपी ब्रम्हपुरी येथील एका खुनाच्या गुन्ह्यातही रेकॉर्डवर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी (कुरखेडा) रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली देसाईगंज ठाण्याचे पो.नि. अजय जगताप यांच्या नेतृत्वात सपोनि संदीप आगरकर, मनीष गोडबोले, पो.अंमलदार विलास बालमवार, नितेश कढव, सतीश बैलमारे, रोशन गरमडे यांनी पार पाडली.