गडचिरोली : शहराजवळच्या कठाणी नदीतून बिनधास्तपणे, दिवसाढवळ्या अनधिकृतपणे रेती काढणाऱ्यांवर अखेर महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कारवाया सुरू केल्या आहेत. गेल्या तीन दिवसात काही ट्रॅक्टर आणि बैलगाड्या जप्त करण्यात आल्या.
‘कटाक्ष’ने यासंदर्भातील सचित्र वृत्त प्रकाशित केल्यानंतर झोपेचे सोंग घेतलेल्या तालुक्याच्या महसूल प्रशासनाला वरिष्ठांनी जागे करत समज दिली. त्यामुळे रेती तस्करांवर आवर घालणे सुरू झाले. सुरूवातीला कारवाई करण्यास निघालेल्या पथकाची खबर रेती तस्करांपर्यंत आधीच पोहोचल्याने ते सावध झाले होते. त्यामुळे गाड्यांमध्ये भरलेली रेती पुन्हा नदीत टाकण्यात आल्याने महसूल पथकाच्या हाती रिकाम्या गाड्याच लागल्या होत्या. त्यांना योग्य समज देण्यात आली. मात्र दुसऱ्या दिवशी पुन्हा तोच क्रम सुरू असल्याचे पाहून ट्रॅक्टर आणि बैलगाड्या जप्त करण्यात आल्या.
याशिवाय ज्या ठिकाणी रेतीचा साठा करून ठेवला जात होता तेथून तो रेतीसाठाही जप्त करण्यात आला. जप्त केलेली रेती महसूल मंडळ गडचिरोली येथे नेण्यात आली. तर गाड्या तहसील कार्यालयात लावण्यात आल्या. या कारवायांमध्ये सातत्या राहील, अशी अपेक्षा नागरिकांकडून केली जात आहे.