गडचिरोली : तब्बल 31 वर्षांपासून नक्षल चळवळीत सक्रिय असलेल्या डीव्हीजनल कमिटी मेंबर (डीव्हीसीएम) कांता उर्फ कांताक्का उर्फ मांडी गालू पल्लो (56 वर्ष) या वरिष्ठ महिला नक्षलीच्या आत्मसमर्पणामुळे नक्षल चळवळीला भामरागड तालुक्यातही उतरती कळा लागली आहे. जिल्ह्यात भामरागड तालुक्यातच सध्या नक्षलवाद्यांचे सर्वाधिक अस्तित्व आहे. पण मोठ्या कॅडरच्या नक्षल नेत्याने चळवळ सोडल्यामुळे चळवळीतील इतरांचे मनोधैर्य खचल्याचे बोलले जाते. यामुळे आता त्यांच्यापुढे ‘आत्मसमर्पण करा, किंवा पोलिसांच्या गोळीने मरा’ हाच पर्याय शिल्लक राहिला आहे.
भामरागड तालुक्याला छत्तीसगडची सीमा लागून असल्यामुळे नक्षलवाद्यांना छत्तीसगडच्या सीमेत आश्रय घेणे सोपे जाते. त्यामुळेच जिल्ह्याच्या इतर भागातून नक्षलींना बऱ्यापैकी हद्दपार करण्यात पोलिसांना यश आले असले तरी भामरागड तालुक्यातील अबुझमाडकडच्या भागात नक्षल चळवळीचे अस्तित्व कायम आहे. मात्र पोलिसांनी त्या भागात वाढवलेल्या नेटवर्कमुळे नक्षलींसाठी अस्तित्वाची लढाई सुरू आहे.
यातच डीव्हीसीएम कांताक्काने पोलिसांपुढे आत्मसमर्पण करून उतरत्या वयात सुरक्षित आश्रय शोधला आहे. मुळच्या गुडंजुर (रिट), ता.भामरागड येथील रहिवासी असलेली कांताक्का 2003 मध्ये मद्देड दलममध्ये भरती झाली होती. पुढे भामरागड, पेरमिली, चातगाव दलममध्येही तिने काम केले. त्यानंतर टिपागड, चातगाव आणि कसनसूर दलममध्ये क्रांतीकारी महिला संघटनेची जबाबदारी तिने सांभाळली. 2015 पासून ती माड एरियामध्ये स्टाफ व सप्लाय टिममध्ये डीव्हीसीएम पदावर कार्यरत होती. तिच्यावर 11 गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे शासनाने 16 लाखांचे इनाम ठेवले होते.
तिच्यासोबत सुरेश ऊर्फ वारलु ईरपा मज्जी (30 वर्षे) या भामरागड दलम सदस्यानेही आत्मसमर्पण करत नक्षल चळवळीचा त्याग केला. त्याच्यावर 2 लाख रुपयांचे बक्षीस होते.
हे आत्मसमर्पण घडवून आणण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदीप पाटील (नागपूर), पोलीस उपमहानिरीक्षक अंकित गोयल, सीआरपीएफचे पोलीस उपमहानिरीक्षक अजय कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, सीआरपीएफ कमांडंट 192 बटालियन परविंदर सिंग या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. नक्षलवाद्यांनी हिंसेचा त्याग करून शांततेचा मार्ग स्वीकारावा. त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आवाहन पो.अधीक्षक नीलोत्पल यांनी केले आहे.