आव्हान पेलणारे विद्यार्थी शाळेत घडवा, अपर आयुक्त ठाकरे यांचे आवाहन

आश्रमशाळेच्या शिक्षकांना गुरुशाला प्रशिक्षण

गडचिरोली: आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळेत शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना बोलके करून गुणवत्ता वाढवा. आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यात इंग्रजी भाषा अडसर होऊ नये यासाठी प्रत्येक शिक्षकाने स्वतःला अद्यावत ठेवून इंग्रजी भाषेतून विद्यार्थ्यांशी संवाद करावा. आश्रमशाळेतील शिक्षणशैलीत आता आमुलाग्र बदल करणे काळाची गरज असून आव्हान पेलणारे विद्यार्थी घडविण्याचे पवित्र कार्य नव्या जोमाने शिक्षकांनी करावे, असे आवाहन आदिवासी विकास विभाग नागपूरचे अपर आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी केले.

आदिवासी विकास विभाग नागपूरअंतर्गत येणाऱ्या गडचिरोली प्रकल्पातील शासकीय आश्रमशाळेतील शिक्षकांसाठी दोन दिवसीय गुरुशाला प्रशिक्षणाच्या समारोपीय कार्यक्रमात ते मार्गदर्शन करीत होते. या समारोपीय कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी विकास विभाग नागपूरच्या अपर आयुक्त कार्यालयाचे उपायुक्त दशरथ कुळमेथे, गुरुशाला शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाचे समन्वयक विकास चौधरी, प्रथम फाउंडेशनचे तज्ज्ञ मार्गदर्शक प्रामुख्याने उपस्थित होते.

राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या 4 अपर आयुक्त कार्यालयस्तरावर 30 प्रकल्पातील सर्व शासकीय आश्रमशाळेत आदिवासी विकास आयुक्त नाशिक व प्रथम फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने गुरूशाला उपक्रम येत्या 3 वर्षाकरिता राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने अपर आयुक्त कार्यालय नागपूरअंतर्गत येणाऱ्या गडचिरोली, अहेरी, भामरागड, नागपूर, वर्धा, देवरी ,भंडारा ,चंद्रपूर, चिमूर या 6 प्रकल्पातील 76 शासकीय आश्रमशाळेतील इयत्ता पहिली ते बारावीला शिकविणारे सुमारे 800 शिक्षक तसेच 142 अधीक्षक, अधीक्षिका यांच्यासाठी क्रमाक्रमाने गुरूशाला प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. गडचिरोली प्रकल्पातील 24 शासकीय आश्रमशाळांतील इयत्ता सहावी ते बारावीला शिकविणाऱ्या 182 शिक्षकांना वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था वनामती नागपूर येथे दोन दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले.

गुरुशालाच्या वतीने तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून आर.के.मिश्रा, श्वेता जैन व इतरांनी प्रशिक्षणार्थी शिक्षकांना मार्गदर्शन केले. प्रशिक्षणार्थीच्या वतीने संदीप दोनाडकर, माला सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे संचालन एपीओ संदीप शेंडे तर एपीओ गिरीजा उईके यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी बी.एल.वाटाणे, प्रसिद्धी प्रमुख सुधीर शेंडे तसेच शरद बनसोड, विद्येश्वरी ढोके, चंद्रकला शोभणे, लक्ष्मी लोखंडे, राहुल तोमस्कर आदींनी सहकार्य केले.