



गडचिरोली : धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत रविवारच्या मध्यरात्री घडलेल्या सर्पदंशाच्या घटनेत तीन विद्यार्थिनींना जीव गमवावा लागला, तर दोन विद्यार्थिनी अत्यवस्थ आहेत. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा सर्वंकष आढावा घेऊन आवश्यक सुधारणा करण्यात येतील. तसेच आश्रमशाळांसाठी नवीन प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) निश्चित करण्यात येईल, असे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी सांगितले. आश्रमशाळेला भेट दिल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
जपतलई (ता.धानोरा) येथील अनुदानित आश्रमशाळेच्या वसतिगृहात रात्री सुमारे 2 वाजता विद्यार्थिनींना सर्पदंश होऊन दीपिका इतवा लकडा (वर्ग 6), सुष्मिता सरोजीत मंडल (वर्ग 8) आणि अनु गाजुर कोरेटी (वर्ग 2) या तीन विद्यार्थिनींचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. सर्पदंश झालेल्या अन्य दोन विद्यार्थिनींना उपचारासाठी गडचिरोलीत दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असलेल्या दीपिका मडावी या विद्यार्थिनीला प्रशासनाने पोलिसांच्या हेलिकॅाप्टरने पुढील उपचारासाठी नागपूरला हलवले. मात्र समृद्धी नैताम या आठवीतील विद्यार्थिनीची स्थिती नाजूक असल्याने तिला कुठेही हलविणे जोखमीचे ठरू शकते. त्यामुळे डॅाक्टरांचे पथक तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करत आहेत. याशिवाय काही मुलींना सर्पदंश झाला नसला तरी घाबरल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार अशोक नेते यांनी तसेच आमदार डॅा.मिलिंद नरोटे यांनी रुग्णालयाला भेट देऊन विद्यार्थिनींच्या कुटुंबियांना धीर दिला. यानंतर डॉ.नेते यांनी धानोरा येथील ग्रामीण रुग्णालय, शवविच्छेदन केंद्र, तसेच दुर्घटना घडलेल्या जपतलाई आश्रमशाळेला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
सहपालकमंत्री ॲड.जयस्वाल यांनी सोमवारी धानोरा येथे मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर जपतलई येथील आश्रमशाळेला भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी आमदार डॉ.मिलिंद नरोटे, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्त आयुषी सिंह आणि पोलीस अधीक्षक एम.रमेश उपस्थित होते.
यावेळी अॅड.जयस्वाल म्हणाले, “ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. कुटुंबीयांची भेट आणि घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर काही बाबींमध्ये अधिक जागरूकतेने व जबाबदारीने काम करण्याची आवश्यकता असल्याचे दिसून आले. काही स्तरांवर झालेल्या त्रुटींचा आढावा घेऊन भविष्यात अशी घटना घडू नये, यासाठी प्रत्येकाने आवश्यक दक्षता घेणे गरजेचे आहे,” असे ते म्हणाले.
14 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक
आश्रमशाळांच्या व्यवस्थापन व विद्यार्थी सुरक्षेसंदर्भात गठित विविध समित्यांचे कामकाज अधिक प्रभावी करण्यासह शासन व्यवस्थेत आवश्यक बदल करण्याच्या दृष्टीने 14 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित यंत्रणांची बैठक घेण्यात येणार असल्याचे ॲड.जयस्वाल यांनी सांगितले. या बैठकीत विद्यार्थी सुरक्षा, आश्रमशाळा व्यवस्थापन, विविध समित्यांचे कामकाज, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि संबंधितांची जबाबदारी यांचा आढावा घेऊन नवीन एसओपी निश्चित करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
कुटुंबियांना आर्थिक मदत
या दुर्घटनेतील मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची शासकीय मदत देण्यात येणार आहे. त्यापैकी प्रत्येकी 1 लाख रुपयांची तात्काळ मदत सुपूर्द करण्यात आली. उर्वरित मदतीची प्रक्रिया सुरू आहे. याशिवाय मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी अतिरिक्त 5 लाख रुपयांची मदत मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. अन्य शासकीय योजनांमधूनही संबंधित कुटुंबीयांना शक्य ते सर्व आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल, असे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी सांगितले.































