Home राजकीय घडामोडी 2 हजारांवर महिलांचे ‘लाल वादळ’ धडकले गडचिरोली पोलीस स्टेशनवर

2 हजारांवर महिलांचे ‘लाल वादळ’ धडकले गडचिरोली पोलीस स्टेशनवर

कामगार संघटनांचे जेलभरो आंदोलन

गडचिरोली : केंद्र सरकारच्या चार श्रमसंहितांच्या विरोधात तसेच कामगार, शेतकरी, शेतमजूर आणि असंघटित कामगारांच्या विविध मागण्यांसाठी सोमवार, 10 ऑगस्ट रोजी गडचिरोलीत जेलभरो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सुमारे 2 हजारावर महिलांसह पुरुषांनी सहभाग घेतला. विशेषतः महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

आयटक, सिटू तसेच शेतकरी-शेतमजूर संघटनांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली बसस्थानकासमोरून मोर्चाला सुरुवात झाली. हा मोर्चा इंदिरा गांधी चौकात पोहोचल्यानंतर तिथे जेलभरो आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणांविरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

आंदोलनकर्त्यांनी चारही श्रम संहिता रद्द कराव्यात, मनरेगा पूर्ववत सुरू करावी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, पेसा मोबिलायझर, शालेय पोषण आहार कर्मचारी, सफाई कामगार व इतर असंघटित कामगारांना ₹ 30 हजार मानधन आणि वयाच्या 60 वर्षांनंतर दरमहा ₹ 5 हजार पेन्शन द्यावी, वीज क्षेत्राचे खासगीकरण व स्मार्ट मीटर योजना रद्द करावी, सर्व शेतमालाला किमान आधारभूत किंमत लागू करावी आणि कामगार-शेतकरी-शेतमजुरांचे हक्क सुरक्षित करावेत, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

या आंदोलनाचे नेतृत्व रमेशचंद्र दहिवले, डॉ.महेश कोपुलवार, अमोल मारकवार, विनोद झोडगे, देवराव चवळे, सचिन मोतकुलवार, विनोद मडावी, राज बन्सोड, नासिर हाश्मी, विवेक खोब्रागडे, डॉ.धर्मराज सोरदे, गोकुळ ढवळे आणि रोशन मेश्राम यांनी केले.

कामगारांचे हक्क, शेतकऱ्यांचा अधिकार आणि असंघटित कष्टकऱ्यांना सामाजिक सुरक्षा मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील, असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला.