जिल्हास्तरीय युवा महोत्सवात यावर्षी प्रथमच हजारोंच्या बक्षिसांची लयलूट

पहा युवक-युवतींच्या कौशल्याची व्हिडीओ झलक

गडचिरोली : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, आणि जिल्हा क्रीडा परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने, तथा कृषी महाविद्यालयाच्या सहकार्याने मंगळवार, दि.28 रोजी एक दिवसीय जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन केले होते. शासनाच्या निर्देशानुसार ठरवून दिलेल्या विविध स्पर्धांमध्ये युवक-युवतींनी उत्साहाने सहभाग घेतला.

या युवा महोत्सवाचे उद्घाटन एसडीपीओ साहिल झरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी गोंडवाना विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण संचालक डॅा.अनिता लोखंडे, जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत दोंदल आणि गोंडवाना सैनिक स्कूलचे उपमुख्याध्यापक ओमप्रकाश संग्रामे हे अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सेवानिवृत्त क्रीडा अधिकारी मदन टापरे यांनी केले.

दिवसभर चाललेल्या विविध स्पर्धाचे परीक्षक म्हणून ओमप्रकाश संग्रामे, संजय घोटेकर, खुशाल म्हस्के, पुरूषोत्तम बोरीकर, अनिता लोखंडे यांनी जबाबदारी सांभाळली. सांस्कृतिक स्पर्धांना सर्वाधिक प्रतिसाद मिळाला.

15 ते 29 या वयोगटातील स्पर्धकांसाठी असलेल्या या महोत्सवातील प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या स्पर्धकांना विभागीय, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळू शकेल. मात्र जिल्हास्तरावर प्रथम, द्वितीय आणि तृतीय आलेल्या स्पर्धकांसाठी यावेळी प्रथमच हजारो रुपयांचे बक्षीस ठेवल्याचे जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी सांगितले.