अहेरी : अहेरी वनपरिक्षेत्रांतर्गत राखीव वनातील 30 हेक्टर वनजमिनीवर शेतकऱ्यांनी केलेले अतिक्रमण हटविण्यात आले. वरिष्ठ वन अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात वन आणि पोलीस विभागाच्या फौजफाट्यासह अनेक जेसीबी आणि इतर यंत्रांच्या मदतीने ही मोहीम राबविण्यात आली. भविष्यात अतिक्रमण केल्यास याच पद्धतीने कठोर कारवाई करण्याचा इशारा वनविभागाने दिला.
अहेरी वनपरिक्षेत्रातील उपक्षेत्र खमनचेरू अंतर्गत नियतक्षेत्र तानबोडीमधील राखीव वन कक्ष क्र.12 मध्ये काही नागरिकांनी वनविभागाची कोणतीही पूर्व परवानगी नसताना 30 हेक्टर वनजमिनीवर अतिक्रमण केले होते. ती जागा शेतीसाठी उपयोगात आणली होती. दरम्यान मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) जी.पी.नरवणे, आलापल्ली वनविभागाच्या उपवनसंरक्षक दीपाली तलमले, उपविभागीय वनअधिकारी एस.जी. पवार यांच्या मार्गदर्शनात अहेरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी एन.डी.इंगळे, आलापल्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी जी.जी. गणवीर, पेरमिलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी एन.टी.चौके, नायब तहसीलदार प्रतिक आढाव, तसेच अहेरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक हर्षल एकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली.
यात फिरत्या पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी उसेंडी, खमनचेरूचे क्षेत्र सहाय्यक बी.ए. तुरानकर, तानबोडीचे वनरक्षक बी.ए. सायंकार, वनपाल एस. टी. सहारे, एस.एम. पडालवार, पी.एस. घुटे, बुध्धावार, आर.आर. डांगरे, बाबुराव मद्देलावार, रंगवार, वनरक्षक शाहजतअली कादरी, एस.जी. उराडे, सी.डी़. नागुलवार, एस.आर. खापरे वनरक्षक, कुमोटी, दिलीप मिच्चा, कुनघाडकर, नमीता दब्बा, पुजा कुसराम, सुनिता लेकामी यांच्यासह आलापल्ली, अहेरी व पेरमिली परिक्षेत्रातील इतर क्षेत्रीय वनकर्मचारी आणि पोलीस विभाग, तसेच जेसीबीच्या सहाय्याने वनजमीन मोकळी करण्यात आली. या धडक कारवाईमुळे वनजमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यांवर जरब निर्माण झाली आहे. भविष्यात वनजमिनीवर कोणीही अतिक्रमण करू नये, तसे आढळल्यास त्यांच्यावर अशाच पद्धतीने कारवाई करण्यात येईल, असे आवाहन अहेरीचे वनपरिक्षेत्राधिकारी एन.डी.इंगळे यांनी केले आहे.
































