चामोर्शी तालुक्यात वाघाने घेतला मका उत्पादक शेतकऱ्याचा बळी

कुटुंबियांना आर्थिक मदत मिळणार

चामोर्शी : तालुक्यातील गणपूरच्या शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. संतोष भाऊजी राऊत (45 वर्ष) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मक्याच्या शेताला पाणी देण्यासाठी गेले असताना दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला.

प्राप्त माहितीनुसार, संतोष राऊत हे शेतात गेल्यानंतर संध्याकाळपर्यंत परत आले नाही. कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली, तेव्हा संतोष यांचा मृतदेह शेतशिवारालगत सापडला. वाघाने त्यांच्या पायाचा लचका तोडलेला होता.

या घटनेची माहिती मिळताच वनविभागासह पोलीस विभागाचे पथक घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी पंचनामा केला. मृत संतोष सुस्वभावी असल्याने ते सर्वपरिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा-मुलगी असा आप्त परिवार आहे.