लोकनृत्य महोत्सवातून झळकले विविध राज्यांचे संस्कृतिक वैभव

भरगच्च उपस्थिती, आज समारोप

गडचिरोली : विविधतेने नटलेल्या देशातल्या विविध राज्यांची आपआपली संस्कृती, लोककला आहे. त्यांची एकाच मंचावरून झलक पाहण्याची संधी गडचिरोलीकरांना तीन दिवसीय ‘लोकनृत्य भारत भारती’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने मिळाली. गेल्या दोन दिवसांपासून दररोज सायंकाळी सादर होत असलेल्या या लोकनृत्यांचा आज (सोमवार) शेवटचा दिवस आहे. विशेष म्हणजे सर्वांना विनामुल्य प्रवेश असल्याने गडचिरोलीकर रसिक विविध राज्यांच्या या सांस्कृतिक वैभवाचा मनमुराद आनंद लुटत आहेत.

दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर, संस्कृती मंत्रालय भारत सरकार आणि सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने 1 ते 3 मार्च दरम्यान दररोज सायंकाळी 6.30 ते रात्री 10 वाजेपर्यंत विद्याभारती कन्या हायस्कूलच्या प्रांगणात या कार्यक्रमाचे सादरीकरण केले जात आहे.

या महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी विद्याभारती कन्या हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे संस्थापक प्राचार्य राजाभाऊ मुनघाटे, गडचिरोलीचे माजी आमदार डॅा.नामदेव उसेंडी, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन मडावी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूरचे सहायक संचालक (कार्यक्रम) दीपक कुलकर्णी आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय, नागपूर विभागाचे सहायक संचालक संदीप शेंडे उपस्थित होते.

या महोत्सवात दोन दिवसात महाराष्ट्रातील प्रसिद्ध लावणी / कोळी नृत्य, मध्य प्रदेशातील बधाई / नोरता, राजस्थानचे रंगीले नृत्य कालबेलिया / भवाई / चरी, हरियाणाचे घुमर/ फाग नृत्य, गुजरातचे जोशपूर्ण सिद्धी धमाल नृत्य, ओडिशाचे संबलपुरी / दालखाई नृत्य आणि छत्तीसगडचे कर्मा नृत्य अशा विविध लोकनृत्यांचे रंगारंग सादरीकरण करण्यात आले.

भारतातील विविध संस्कृती आणि कला जतन करण्यासाठी, तसेच नवीन पिढीला त्याची माहिती मिळावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक लोककला आणि कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने हा महोत्सव आयोजित केला जात आहे. या महोत्सवाच्या आयोजनासाठी दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्था गडचिरोली यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.