Home दैनंदिन बातम्या सलग तीन वर्षांपासून जिल्ह्यात बारावीचा निकाल घसरगुंडीवर

सलग तीन वर्षांपासून जिल्ह्यात बारावीचा निकाल घसरगुंडीवर

यावर्षी पूर्व विदर्भात सर्वात मागे

गडचिरोली : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (स्टेट बोर्ड) घेतलेल्या यावर्षीच्या बारावीच्या परीक्षेत गडचिरोली जिल्ह्याने पूर्व विदर्भातील 6 जिल्ह्यांमध्ये सर्वात कमी निकाल दिला आहे. परीक्षा देणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांपैकी 79.63 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष म्हणजे सलग तीन वर्षांपासून जिल्ह्यात उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी सतत कमी-कमी होत आहे. विद्यार्थ्यांच्या दृष्टिने बारावीचे महत्व कमी होणे हे त्यामागील कारण आहे, की शिक्षणाचा दर्जा खालावल्याचे हे लक्षण आहे, असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे.

राज्य शिक्षण मंडळाने शनिवारी (दि.2 मे) बारावी परीक्षेचा निकाल आॅनलाईन जाहीर केला. यात जिल्ह्यात सर्वाधिक चांगला निकाल कोरची तालुक्याने दिला आहे. या तालुक्याची निकालाची टक्केवारी 89.54 टक्के आहे. त्याखालोखाल मुलचेरा तालुक्याचा निकाल 88.37 टक्के, तर धानोरा तालुक्याचा निकाल 87.26 टक्के आहे. गडचिरोली तालुक्याचा निकाल 80.74 टक्के आणि सर्वात कमी (61.63 टक्के) एटापल्ली तालुक्याचा निकाल लागला आहे. विशेष म्हणजे जिल्हाभरात मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण यावर्षीही जास्त आहे.

गडचिरोलीच्या शिवाजी कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयातील तन्मय कुमारशाहा किरंगे आणि तुषार राजेश ताकसांडे या विद्यार्थ्यांनी प्रत्येकी 89.33 टक्के गुण घेऊन जिल्ह्यात स्टेट बोर्डातून अव्वल येण्याचा बहुमान पटकावला. याशिवाय गोंडवाना सैनिकी शाळेचा ऋषिकेश दिलीप येलुरे याने 88.83 टक्के गुण घेऊन द्वितीय स्थान पटकावले आहे.