Home दैनंदिन बातम्या आरोग्य कार्यक्रम अंमलबजावणीत गडचिरोली जिल्हा राज्यात तिसरा

आरोग्य कार्यक्रम अंमलबजावणीत गडचिरोली जिल्हा राज्यात तिसरा

रक्ताक्षयाच्या मातांवर यशस्वी उपचार

​गडचिरोली : आरोग्य व्यवस्थापन व माहिती प्रणाली (HMIS) अंतर्गत माहे एप्रिल 2025 ते मार्च 2026 या एक वर्षाच्या कामाच्या मूल्यमापनात गडचिरोली जिल्ह्याने नेत्रदीपक कामगिरी केली आहे. राज्य कुटुंब कल्याण कार्यालय, पुणे यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गडचिरोली जिल्ह्याने 85 गुण मिळवून संपूर्ण महाराष्ट्रात तिसरा क्रमांक पटकावला आहे.

​निर्देशांकनिहाय जिल्ह्याची कामगिरी

जिल्ह्यात माता आरोग्याबाबत जनजागृती यशस्वी ठरताना दिसत आहे. गरोदर मातांची नोंदणी निर्धारित लक्ष्याच्या १०० टक्के झाली आहे. विशेष म्हणजे 12 आठवड्यांपूर्वीची प्रसूतीपूर्व नोंदणी 89 टक्के पूर्ण झाली आहे. यामुळे गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळातच आरोग्य सेवा देणे सोयीचे झाले आहे.

​प्रसूतीपूर्व तपासणी आणि उपचार

मातांच्या आरोग्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून, किमान 4 प्रसूतीपूर्व तपासण्यांचे प्रमाण 100
टक्के नोंदवण्यात आले आहे. तसेच आरोग्य तपासणीदरम्यान तीव्र रक्ताक्षय आढळलेल्यांपैकी 96 टक्के मातांना यशस्वीरीत्या उपचार देऊन त्यांच्या आरोग्यात सुधारणा करण्यात आली आहे.

​लसीकरण मोहीम

जिल्ह्यात बालकांमधील लसीकरणाचे काम अत्यंत समाधानकारक आहे. प्राथमिक लसीकरणाचे उद्दिष्ट 92 ते 99 टक्क्यांपर्यंत साध्य झाले आहे. मात्र व्हिटॅमिन ‘A’च्या डोसचे प्रमाण 90 टक्के असून, त्यामध्ये अधिक वाढ करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

​कुटुंब कल्याण व आव्हानात्मक क्षेत्र

आरोग्य अहवालानुसार, कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत एकूण प्रसुतीपैकी पीपीआययुसीडी बसविण्याचे प्रमाण केवळ 23 टक्के आहे. हे जिल्ह्यासाठी एक आव्हानात्मक क्षेत्र असून यामध्ये येणाऱ्या काळात सुधारणा करण्यावर भर दिला जाणार आहे.

रँकिंगमुळे नवीन ऊर्जा

​”गडचिरोली सारख्या दुर्गम भागात आरोग्य सेवा पोहोचवणे हे मोठे आव्हान होते. मात्र आमचे आरोग्य कर्मचारी आणि अधिकारी यांच्या सांघिक प्रयत्नांमुळे आम्ही राज्यात तिसरा क्रमांक मिळवू शकलो. माता मृत्यू आणि बाल मृत्यूदर कमी करणे हेच आमचे अंतिम ध्येय आहे. या रँकिंगमुळे आमच्या कामाला नवीन ऊर्जा मिळाली आहे,” असे ​मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे म्हणाले.

​”आम्ही प्रत्येक आरोग्य निर्देशांकावर बारकाईने लक्ष दिले आहे. ज्या ठिकाणी आमचे काम कमी आहे, अशा तालुक्यांचा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांचा आम्ही नियमित आढावा घेऊ. कामाची गुणवत्ता वाढवून जिल्ह्याला आरोग्य क्षेत्रात प्रथम क्रमांकावर नेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू,” अशी प्रतिक्रिया जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा.प्रताप शिंदे यांनी व्यक्त केली.