गडचिरोली : जिल्ह्यातील माओवादग्रस्त आणि अतिदुर्गम भाग म्हणून ओळखऱ्या जाणाऱ्या हेडरी उपविभागात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या गर्देवाडा पोलीस मदत केंद्रात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी रक्षाबंधनाचा सण साजरा केला. त्या ठिकाणी महिला पोलीस अंमलदार आणि् भगवंतराव आश्रमशाळेच्या विद्यार्थिनींनी रक्षाबंधनाच्या उपक्रमात सहभाग घेऊन सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना राख्या बांधल्या.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश यांनी महिला पोलीस अंमलदारांचे मनोबल वाढविण्यासाठी गर्देवाडा येथे भेट देवुन रक्षाबंधनाचा सण साजरा केला. यावेळी गर्देवाडा गावातील 80 ते 100 महिला, पुरुष व 60 ते 70 शालेय विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थित सर्वांना मान्यवरांच्या हस्ते विविध साहित्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी शुभेच्छा देताना पोलीस अधीक्षक नीलोत्पल आपल्या मार्गदर्शनात म्हणाले, ‘गडचिरोली पोलीस दलात दुर्गम-अतिदुर्गम भागात महिला पोलीस अंमलदार माओवादविरोधी अभियानात अग्रभागी आहेत. अनेक वेळा कर्तव्यामुळे हा सण त्यांना कुटुंबासोबत नाही तर कर्तव्यावरच साजरा करावा लागतो. त्यामुळे कर्तव्याला प्रथम प्राधान्य देणाऱ्या महिला पोलीस अंमलदारांसोबत आम्ही रक्षाबंधनाचा सण साजरा करत असल्याचे ते म्हणाले. तसेच आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी सीआरपीएफचे एटापल्ली येथील उपकमांडंट राजीव सिंग, असिस्टंट कमांडन्ट विक्रम साकेत तसेच गर्देवाडाचे प्रभारी अधिकारी पीएसआय शिंदे, शिक्षकवृंद प्रामुख्याने उपस्थित होते.
सी-60 जवानांना बांधल्या राख्या
यासोबतच खडतर सेवा देणारे सी-60 चे जवान अतिसंवेदनशील भागात सेवा देताना आपल्या कुटुंबियांसोबत रक्षाबंधन सण साजरा करू शकत नाहीत. त्यामुळे सी-60 च्या अधिकारी व अंमलदारांना फुले-आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क गडचिरोलीच्या विद्यार्थीनींनी व प्रा.प्रज्ञा वनमाळी यांनी विशेष अभियान पथक कार्यालय गडचिरोली येथे राख्या बांधुन रक्षाबंधन सण साजरा केला. जिल्ह्रातील विविध पोस्टे/उपपोस्टे व पोमकें येथेही रक्षाबंधनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.