Home दैनंदिन बातम्या चपराळातील फुलपाखरांच्या रंगीत विश्वात रमले महाविद्यालयीन विद्यार्थी

चपराळातील फुलपाखरांच्या रंगीत विश्वात रमले महाविद्यालयीन विद्यार्थी

निसर्ग अभ्यासकांनी केले मार्गदर्शन

गडचिरोली : ‘बिग बटरफ्लाय मंथ’निमित्त चपराळा अभयारण्यात आयोजित फुलपाखरू सर्वेक्षण कार्यक्रमात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभागी होऊन फुलपाखरांच्या अनोख्या रंगीत विश्वाचे अवलोकन केले. उपविभागीय वन अधिकारी (वन्यजीव) आलापल्ली व ग्रीन्स संस्थेच्या संयुक्त विद्यमाने या सर्व्हेक्षणाचे आयोजन केले होते.

मुख्य वनसंरक्षक गजेंद्र नरवणे, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक डॅा.प्रभुनाथ शुक्ल, आलापल्ली वनविभागाचे उपविभागीय वन अधिकारी (वन्यजीव) मंगेश बाळापुरे, गडचिरोलीचे मानद वन्यजीव रक्षक मिलिंद उमरे व ग्रीन्स संस्थेच्या अध्यक्ष अंजली कुळमेथे यांच्या नेतृत्वात आयोजित या एक दिवसीय कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ निसर्ग अभ्यासक संजय शेगावकर, चंद्रपूरचे मानद वन्यजीव रक्षक मुकेश भांदककर यांची प्रमुख उपस्थिती होती.

या एक दिवसीय शिबिरात महात्मा ज्योतीबा फुले कला महाविद्यालय आणि श्री सद्गुरू साईबाबा विज्ञान महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी चपराळा अभयारण्यातील ईल्लूर व सीतापूर तलाव परीसरातील विविध फुलपाखरांचे निरीक्षण करण्यात आले. या उपक्रमात ब्लू टायगर, प्लेन टायगर, स्ट्राईप टायगर, कॉमन क्रो, कॉमन मॉरमॉन, लाईम बटरफ्लाय, ग्रेट एगफ्लाय, कॉमन एमिग्रंट, कॉमन ग्रास यलो, कॉमन जेझेबेल, कॉमन रोज तसेच महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू ब्लू मॉर्मन अशी विविध फुलपाखरे विद्यार्थ्यांनी बघितली.

या फुलपाखरांची नावे, त्यांची वैशिष्ट्ये, फुलपाखरांचे जैवविविधता व निसर्ग संवर्धनातील महत्त्व आदींची सविस्तर माहिती आलापल्ली वनविभागाचे उपविभागीय वनअधिकारी (वन्यजीव) मंगेश बाळापुरे, गडचिरोलीचे मानद वन्यजीव रक्षक मिलिंद उमरे व ग्रीन्स संस्थेच्या अध्यक्ष अंजली कुळमेथे, तथा ज्येष्ठ निसर्ग अभ्यासक संजय शेगावकर, मुकेश भांदककर यांनी दिली. निरीक्षणानंतर समूह चर्चेत निसर्गाचे महत्त्व सांगत, निसर्ग संवर्धनाचे आवाहन करण्यात आले.

निसर्ग संवर्धन क्षेत्रातील व वनविभागातील करीअरच्या संधींबद्दलही महत्त्वपूर्ण माहिती यावेळी देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरे देत त्यांची ज्ञानपूर्ती करण्यात आली. या फुलपाखरू सर्वेक्षण कार्यक्रमासाठी चपराळ्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश लांडगे, क्षेत्र सहायक चंद्रकांत सडमेक, क्षेत्र सहायक धनंजय कुमरे तसेच वनविभागातील इतर अधिकारी, कर्मचारी आदींनी सहकार्य केले.