गडचिरोली : जिल्ह्यातील शासकिय धान खरेदी घोटाळ्याच्या मालिकेत अनेक नामांकित राईस मिलर्सच्या चौकश्यांचे अहवाल शासनाकडे जमा असताना साकोलीचे आमदार तथा काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांच्या नावाचा आणि त्यांच्या लेटरपॅडचा गैरवापर करण्याचा कारनामा कोणी केला, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून गैरवापर करणाऱ्याचे नाव पुढे आणले जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्वत: नाना पटोले त्यासाठी ईच्छुक आहे की नाही, अशीही चर्चा नागरिकांमध्ये आहे.
अनेक राईस मिलर्सच्या प्लँटचे उद्घाटन नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आले. पटोले यांनी मिलर्स व उद्योजकांना अनेकदा अडचणींच्या काळात खंबिरपणे आपल्या पाठिशी उभे राहण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या अनेक कार्यक्रमात मिलर्स लोकांनी सढळ हाताने मदत केली. मात्र अचानक असे काय घडले की ज्यामुळे नाना पटोले यांनी शासकिय धान खरेदीत राईस मिलर्सनी घोटाळा केला असे नमुद करत थेट विधानसभेत चौकशीची मागणी केली? एवढ्यावरच न थांबता पणन व्यवस्थापकांकडून अनेक राईस मिलर्सच्या मिल व गोडाऊनच्या चौकश्या लावल्या. असे असताना अचानक पटोले यांच्या लेटरपॅडवर, त्यांच्या सहीनिशी तक्रार मागे घेत असल्याचे नमुद करणारे पत्र संबंधित विभागाला देण्यात आले.
नाना पटोले यांनी आपली तक्रार परत घेतलेली नसल्याचे स्पष्ट केले. जर तसे असेल तर त्यांच्या लेटरपॅडचा आणि सहीचा गैरवापर कोणी आणि कशा पद्धतीने केला याच्या खोलात जाणे आवश्यक होते. मात्र पटोले यांनी त्याबाबत रितसर तक्रारच केली नसल्याचे समजते. हा कारनामा करणारी व्यक्ती पटोले यांच्या जवळची असल्यानेच त्यांनी ते नाव पुढे येऊ नये याची काळजी घेतल्याची चर्चा सुरू आहे. यात देसाईगंज येथील पटोले यांच्या जवळच्या असलेल्या राईस मिलर्स कुटुंबातील व्यक्तीच्या नावाची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.
खोटे पत्र देण्याचा कारनामा करणाऱ्याला उघड केले नाही तर ते याच पद्धतीने पुढेही मोठ्या नेत्यांच्या लेटरपॅडचा गैरवापर करतील, किंवा यापूर्वीही त्यांनी अशा पद्धतीने खोटे पत्र देऊन कोणावर दबाव आणला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आ.नाना पटोले यात कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
































