Home राजकीय घडामोडी खा.डॉ.किरसान यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार

खा.डॉ.किरसान यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार

स्पर्धा परीक्षेचे पुस्तक वितरण 19 ला

गडचिरोली : गडचिरोलीचे खासदार डॅा.नामदेव किरसान यांच्या वाढदिवसानिमित्त आज गडचिरोलीसह लोकसभा क्षेत्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा परीक्षेची पुस्तके वाटण्याचा नियोजित कार्यक्रम मात्र आज ऐवजी येत्या 19 जुलै रोजी होणार आहे. (अधिक बातमी खाली वाचा)

सकाळी 9 वाजता जवाहर नेहरू उच्च प्राथमिक शाळा रामनगर, गडचिरोली येथे शालेय विद्यार्थ्यांना शहर काँग्रेस कमिटीकडून नोटबुकचे वितरण केले जाणार आहे. त्यानंतर सावित्रीबाई फुले उच्च प्राथमिक शाळा, गोकुलनगर येथे तालुका काँग्रेस कमिटी (अल्पसंख्याक विभाग) कडून नोटबुकचे वितरण होणार आहे.

सकाळी 11 वाजता जिल्हा महिला रुग्णालयात महिला काँग्रेसकडून रुग्णांना फळवाटप, तर दुपारी 12 वाजता जिल्हा महिला रुग्णालयात ‘मदतीचा घास’ उपक्रमांतर्गत भोजनदान केले जाणार आहे. यासोबतच संपूर्ण लोकसभा क्षेत्रात तालुकास्तरावर विविध गावांमध्ये इतर सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याचे आयोजकांनी कळविले.

स्पर्धा परीक्षा पुस्तक वितरण 19 जुलैला

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या युवक-युवतींना मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळावे, तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार अभ्यास साहित्य विनामूल्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांचे मोफत वितरण कार्यक्रम 14 जुलै रोजी आयोजित करण्यात आला होता. मात्र या कार्यक्रमासाठी पुणे येथून मागविण्यात आलेली स्पर्धा परीक्षेची पुस्तके तिकडील मुसळधार पावसामुळे व वाहतुकीवर झालेल्या परिणामामुळे नियोजित वेळेत गडचिरोली येथे पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे सदर कार्यक्रम रविवार, दिनांक 19 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता सुमानंद सभागृह, गडचिरोली होणार आहे, असे खासदार जनसंपर्क कार्यालयाने कळविले.