प्रतीक्षा यादीतील घरकुल लाभार्थ्यांची निराशा, अनेकांना पुन्हा हुलकावणी

पारडीत 252 पैकी 73 जणांनाच लाभ

गडचिरोली : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी मोठा गाजावाजा करत 36 हजार नागरिकांना एकाच झटक्यात घरकुल मंजूर करण्यात आले. असे असले तरी अजूनही बरेच पात्र नागरिक घरकुल मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यात जवळच्या पारडी (कुपी) येथील 252 प्रतीक्षा यादीमधील पात्र नागरिकांपैकी केवळ 73 लोकांनाच घरकुल मंजूर केल्यामुळे तेथील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

पारडी येथे मागील 3 ते 4 वर्षापूर्वी शासनाच्या आदेशानुसार रितसर ग्रामसभा घेऊन गावातील कच्ची घरे असलेल्या गोरगरीब नागरिकांना शासनाच्या घरकुलाचा लाभ देण्यासाठी 252 जणांची यादी तयार करण्यात आली. काही वर्षांपासून घरकुले मंजूर झालेली नाही. त्यामुळे यावेळी त्या सर्वांना घरकुल मिळेल अशी आशा होती. मात्र त्यातून केवळ 73 जणांनाच प्रत्यक्ष लाभ दिल्यामुळे इतर वंचित नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

पावसाच्या पाण्यात अनेक लोकांची कच्ची घरे पडली आहेत. त्यामुळे त्या नागरिकांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून उर्वरित लोकांनाही घरकुलाचा लाभ द्यावा, अशी मागणी सरपंच संजय निखारे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे.