सिरोंचा : तालुक्यातील अंकिसा येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) विजय मिळवला आहे. माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धनबाबा आत्राम यांच्या नेतृत्वात सिरोंचा तालुक्यातील कार्यकर्त्यांनी यासाठी मेहनत घेऊन एकजुटीने हा एकतर्फी विजय मिळवला.

दि.16 ला अंकिसा येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीत आदिवासी विविध सेवा सहकारी संस्थेच्या 5 जागेसाठी ही निवडणूक झाली. यात सर्वसाधारण 2 जागा, इतर मागासवर्ग 1, एससी 1, एनटी 1 अशा 5 जागांसाठी लढत झाली. तत्पूर्वी एसटी प्रवर्गातील 7 उमेदवार बिनविरोध निवडून आले. निवडणूक झालेल्या जागांसाठी बॅलेट पेपरवर मतदान झाले. 4 वाजता मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाली. यात बाजार समिती अध्यक्ष असलेले शेतकरी सहकारी पॅनलचे सतीश गांजीवर, उपाध्यक्ष श्रीहरी भंडारी यांच्यासह नागेंद्र चिटकेशी, मनोहरअरिगेला, प्रवीण अकुला, कार्तिक जंगम, पल्लम मारालू यांचा दणदणीत विजय झाला. विरोधी गटाच्या सर्व उमेदवारांना हार पत्करावी लागली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लुरी, सय्यद सालार यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते.