Home दैनंदिन बातम्या मानवाधिकार संघटनेची अतिदुर्गम भागात गावकऱ्यांसोबत दिवाळी

मानवाधिकार संघटनेची अतिदुर्गम भागात गावकऱ्यांसोबत दिवाळी

बंदूर व गुरेकसात विकासावर चर्चा

गडचिरोली : जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील अतिदुर्गम, घनदाट जंगलांनी वेढलेल्या बंदूर आणि गुरेकसा या गावातील आदिवासी बांधवांसोबत राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेश अध्यक्ष डॉ.प्रणय खुणे व इतर पदाधिकाऱ्यांनी संवाद साधत त्यांच्यासोबत दिवाळी सणाचा आनंद घेतला.

समस्त ग्रामस्थांना फराळाचे वाटप करत खुणे यांनी आपुलकीने संवाद साधला. यावेळी गावाच्या विकासावर आणि स्थानिक समस्यांवर चर्चा करण्यात आली. गावातील नागरिकांच्या महत्त्वाच्या समस्या जाणून घेऊन त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्यासोबत व संवर्ग विकास अधिकारी दुबे यांच्याशी थेट भ्रमणध्वनीवर चर्चा करून, संबंधित विषयावर तोडगा काढण्यासाठी चर्चा करण्यात आली.

यावेळी मानवाधिकार संघटनेचे सल्लागार देवानंद खुणे, जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, युवा मोर्चाचे अध्यक्ष विनोद किरमे, ज्येष्ठ नेते दीपक खुणे, पारस खुणे, नितेश खुणे, शुभम दास, मंगेश मुराडे, अवी मंडल, तसेच बंदूर व गुरेकसा येथील लालसाय तुलावी, सुनील किरकेटा, राजेश तुलावी, बारसाय गावडे, रवींद्र कराळे यांच्या उपस्थितीत स्थानिक नागरिकांनी प्रेमळ पाहुणचार केला. ग्रामस्थांच्या मायेमुळे ही दिवाळी भेट अधिकच संस्मरणीय ठरली.

यावेळी प्रत्येक घरात आनंद, प्रत्येक मनात विश्वास आणि प्रत्येक गावात विकासाचा प्रकाश नांदो अशी आशा डॉ.प्रणय खुणे यांनी व्यक्त केली.