Home दैनंदिन बातम्या जनजातीय गौरव सेवा सप्ताहाला सुरूवात, जिल्ह्यात विविध कार्यक्रम

जनजातीय गौरव सेवा सप्ताहाला सुरूवात, जिल्ह्यात विविध कार्यक्रम

भाजप पदाधिकाऱ्यांनी दिली माहिती

गडचिरोली : आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त 11 ते 18 नोव्हेंबर या कालावधीत जनजातीय गौरव सेवा सप्ताह साजरा केला जात आहे. त्यानिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती भाजप आदिवासी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॅा.देवराव होळी आणि इतर पदाधिकाऱ्यांनी दिली.

येथील विश्राम भवनात आयोजित या पत्रपरिषदेला आमदार डॅा.मिलिंद नरोटे, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, माजी आमदार कृष्णा गजबे, माजी आमदार डॅा.नामदेव उसेंडी, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, डॅा.नितीन व डॅा.चंदा कोडवते, ओमकार मडावी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

यानिमित्ताने सरकारने आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी राबविलेल्या योजनांचीही माहिती आदिवासी समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी तीन दिवस युवा संवाद होणार असल्याची माहिती आमदार डॅा.मिलिंद नरोटे यांनी दिली.

यावेळी बोलताना डॉ.देवराव होळी म्हणाले, केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार देशभरात 11 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबर या कालावधीत जनजातीय गौरव दिन सप्ताह विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात येणार आहे. आदिवासी समाजाचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, थोर आदिवासी क्रांतिकारकांचा इतिहास, संस्कृती, परंपरा आणि केंद्र व राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

या सप्ताहांतर्गत 13 नोव्हेंबर रोजी जनजागृती कार्यक्रम, दि.14 ला महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता, दि.15 रोजी भगवान बिरसा मुंडा यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात येणार आहे. याशिवाय दि.16, 17 व 18 नोव्हेंबर रोजी विविध सामाजिक, सांस्कृतिक व जनजागृतीपर कार्यक्रमांसह शासनाच्या आदिवासी समाजासाठी असलेल्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी युवकांशी संवाद होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

भगवान बिरसा मुंडा यांचा संघर्ष, त्याग आणि देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यक असून, जनजातीय गौरव दिनाच्या माध्यमातून आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास समाजासमोर आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असेही डॉ.होळी म्हणाले.