गडचिरोली : लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (LMEL) यांनी त्यांच्या कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (CSR) उपक्रमांतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील 24 विद्यार्थ्यांना ऑस्ट्रेलियातील पर्थ येथील कर्टिन विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी पाठविले जात आहे. त्यासाठी प्रतिविद्यार्थी दरवर्षी 50 लाखांचा खर्च केला जाणार आहे. नागपुरातील ‘अॅडव्हान्टेज विदर्भ’मध्ये या विद्यार्थ्यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, लॅायड्सचे व्यवस्थापकीय संचालक बी.प्रभाकरन यांच्या हस्ते बोर्डीग पास देऊन निरोप देण्यात आला.
सुरजागड लोहखनिज खाणींचे पूर्ण क्षमतेने कामकाज सुरू झाल्यानंतर, व्यवस्थापकीय संचालक बी.प्रभाकरन यांच्या नेतृत्वाखाली LMEL ने औद्योगिक प्रगतीत स्थानिक युवकांसाठी जागतिक शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे. 4 मार्च 2024 रोजी ग्रामीण महाराष्ट्राला आंतरराष्ट्रीय शैक्षणिक उत्कृष्टतेशी जोडण्याचे वचन प्रभाकरन यांनी दिले होते, त्याची वचनपूर्ती यानिमित्ताने केली. अॅडव्हान्टेज विदर्भाच्या समारोप समारंभात माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, हा कार्यक्रम गडचिरोलीतील जनतेप्रती असलेल्या त्यांच्या जबाबदारीचे आणि दीर्घकाळ माओवादाने प्रभावित राहिलेल्या या भागासाठी शाश्वत भविष्य घडवण्याच्या त्यांच्या निर्धाराचे प्रतिबिंब आहे.
त्यांनी माहिती दिली की, सध्या बॅच 1 आणि 2 मधील 10 विद्यार्थी पर्थ येथे शिक्षण घेत आहेत, तर आणखी 14 विद्यार्थ्यांना व्हिसा मिळाला असून ते लवकरच आपले अभ्यासक्रम सुरू करणार आहेत. यशस्वी पदवीधरांना LMEL मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पदांवर नोकरीची संधी देण्यात येईल आणि पुढे ते कर्मचारी शेअर मालकी योजना (ESOP)साठी पात्र ठरतील. कर्टिन विद्यापीठात हे विद्यार्थी अभियांत्रिकी (इंजिनिअरिंग) आणि व्यवस्थापन (मॅनेजमेंट) विषयांमध्ये शिक्षण घेत आहेत, अशी माहिती प्रभाकरन यांनी दिली.
आपल्या भाषणात नितीन गडकरी यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि लवकरच गडचिरोलीमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची विद्यापीठे उभी राहतील, असा विश्वास व्यक्त केला.
“लॉयड्स–कर्टिन पूर्णतः प्रायोजित शैक्षणिक कार्यक्रम” अंतर्गत LMEL कडून या विद्यार्थ्यांचे 100 टक्के शिक्षण शुल्क, निवास व्यवस्था, राहणीमान खर्च, प्रवास तसेच प्रशासकीय खर्च केला जात आहे. कंपनी दरवर्षी प्रतिविद्यार्थी सुमारे 50 लाख रुपयांचा खर्च करत असून, एकूण प्रतिविद्यार्थी गुंतवणूक ₹1.5 कोटी ते ₹2 कोटी इतकी होणार आहे.
लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशनमार्फत राबविण्यात येणारा हा कार्यक्रम तळागाळातील गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना भविष्यातील नेतृत्वासाठी सक्षम बनवण्यावर केंद्रित आहे.
या उपक्रमाद्वारे LMEL समावेशक विकासाप्रती आपली बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित करत आहे.
































