गडचिरोली : ग्रामीण भागात आदिवासी समाजातील महिलांना मासिक पाळीच्या काळात ज्या ‘कुर्माघरा’त राहावे लागते ती घरे अडगळीत, अस्वच्छ आणि आवश्यक सुविधांअभावी असुरक्षित ठरत आहेत. त्याला पर्याय म्हणून सीताटोला या गावात श्रमदानातून उभारलेले ‘मावा आस्काना लोण’ (आपल्या हक्काचे घर) आदर्श ठरत आहे. अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत सोमवारी त्याची पाहणी केली. अशा आरोग्य व सुरक्षिततेसाठी सकारात्मक संकल्पनांना शासनस्तरावर पाठबळ देण्याचे सुतोवाच त्यांनी केले. त्यासंदर्भात आज (दि.10) आदिवासी विकास विभागाकडून विस्तृत आढावा घेतला जाणार आहे.
महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲड.धर्मपाल मेश्राम सोमवारी गडचिरोलीच्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी धानोरा तालुक्यातील सीताटोला या गावाला भेट दिली. तेथील जुने कुर्मा घर तसेच स्पर्श या समाजसेवी संस्थेने कुर्माघराला पर्याय म्हणून तयार केलेल्या नवीन ‘मावा आस्काना लोण’ या संकल्पनेतून उभारलेल्या घराची पाहणी केली. स्थानिक महिलांनी स्वतः श्रमदान करून ही घरे उभारली असून स्पर्श संस्थेने त्यांना आवश्यक सहकार्य केले आहे. या उपक्रमाचे ॲड.मेश्राम यांनी कौतुक केले. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त डॉ.सचिन मडावी, स्पर्श संस्थेचे अध्यक्ष डॉ.दिलीप बारसागडे तसेच स्थानिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
नगर परिषदेतील कामकाजाचा आढावा
अॅड.मेश्राम यांनी गडचिरोली नगर परिषदेलाही भेट देऊन नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर, इतर पदाधिकारी व नगरसेवक तसेच मुख्याधिकारी सुर्यकांत पिदुरकर यांच्याशी विविध विषयांवर सविस्तर संवाद साधला. यावेळी त्यांनी नगरपरिषदेच्या कामकाजाचा आढावा घेत शासनाकडे पाठपुरावा करावयाचे प्रलंबित विषय, विशेषतः अनुसूचित जाती व जमातीशी संबंधित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आयोगामार्फत प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही दिली.
ॲड.मेश्राम यांनी नगर परिषदेत राबविण्यात येणाऱ्या लाड पागे समितीच्या योजनेची माहिती घेताना, सफाई कामगारांच्या मंजूर 11 पदांपैकी 9 पदे नगर परिषदेने अधिकार नसताना व्यपगत केली असल्याचे निदर्शनास आणले. याबाबत संबंधितांकडून स्पष्टीकरण देण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच मागील एक वर्षात नगरपरिषदेने सादर केलेल्या विकासकामांच्या प्रस्तावांची पाहणी करून कोणते प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आले याची माहिती घेतली. यासोबतच नगरपरिषदेचे लेखा परीक्षण कधी झाले, त्यामध्ये कोणते शेरे नोंदविण्यात आले याबाबतही त्यांनी विचारणा केली. लेखा परीक्षण अहवालाची प्रत्यक्ष पाहणी करत आर्थिक शिस्त आणि पारदर्शकतेवर भर देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवकांना त्यांनी शुभेच्छा देत, नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी समर्पित भावनेने काम करण्याचे आवाहन केले.
































