गोंडवाना विद्यापीठात राष्ट्रपिता महात्मा गांधी अध्यासन केंद्र सुरू

बापूंचे विचार पथदर्शी- डॉ.मोहिते

गडचिरोली : गांधींच्या विचारांची गरज आजही तितकीच आहे, जितकी स्वातंत्र्यपूर्व काळात होती. महापुरुषांनी सामाजिक सलोखा निर्माण करण्याचे काम केले. त्यामुळे त्यांना विशिष्ट जाती-धर्मात वाटून न घेता त्यांच्या मूल्यांचा अंगीकार करावा. कारण त्यांचे विचार आजही समाजाला सुसंगत आणि पथदर्शी आहेत, असे विचार महाराष्ट्र मागासवर्ग आयोगाचे समाजशास्त्रज्ञ डॉ.अंबादास मोहिते यांनी व्यक्त केले.

गोंडवाना विद्यापीठात राष्ट्रपिता महात्मा गांधी अध्यासन केंद्राचे उद्घाटन डॅा.मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते मार्गदर्शक म्हणून बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे, तसेच विशेष अतिथी म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.अनिल हिरेखण, प्रस्तावक व व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ.विवेक गोर्लावार, विश्वशांतीदूत प्रकाश अर्जुनवार, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.संजय गोरे प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.

यावेळी डॉ.अंबादास मोहिते यांनी महात्मा गांधींच्या सर्वोदय, अंत्योदय, नई तालीम, ग्रामस्वराज्य, सत्य, अहिंसा या संकल्पनांवर प्रकाश टाकला. कुलसचिव डॉ.अनिल हिरेखण यांनी महापुरुषांचे विचार हे मानवी कल्याणासाठी काम करतात. त्यामुळे या अध्यासन केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी गांधीजींच्या विचारांचा अभ्यास करावा आणि त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी असे सांगितले. प्रास्ताविक डॉ.विवेक गोर्लावार यांनी, तर संचालन अध्यासन केंद्राचे समन्व्यक डॉ.प्रमोद जावरे यांनी केले.

अध्यासन केंद्राचा उद्देश
या अध्यासन केंद्राच्या माध्यमातून गांधीजींच्या सत्य, अहिंसा, स्वावलंबन, सामाजिक समता, ग्रामविकास व नैतिक मूल्यांवर आधारित संशोधनाला चालना मिळणार आहे. तसेच समकालीन सामाजिक प्रश्न, लोकशाही मुल्ये, सामाजिक न्याय, शांतता आणि मानवतावादी दृष्टिकोन यावर आधारित संशोधन प्रकल्प, व्याख्याने, परिसंवाद व विस्तारकार्य राबविण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील सामाजिक विकासासाठी उपयुक्त ठरणारे संशोधन व जनजागृतीचे कार्य या केंद्राच्या माध्यमातून प्रभावीपणे केले जाणार आहे.