गडचिरोली : राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या ‘राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यास दौरे – राज्य पुरस्कृत योजना’ अंतर्गत सन 2026-27 मध्ये युरोप व चीन येथील आधुनिक शेती पद्धती, तंत्रज्ञान आणि कृषी नवकल्पनांचा अभ्यास करण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज सादर करण्यासाठी 15 ऑगस्ट 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
या योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातून पाच शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. त्यात एक महिला शेतकरी, एक कृषी पुरस्कारप्राप्त अथवा पीक स्पर्धा विजेता आणि इतर तीन शेतकऱ्यांचा समावेश असेल. पात्र शेतकऱ्यांना दौऱ्याच्या एकूण खर्चाच्या 50 टक्के किंवा कमाल 2 लाख रुपये, यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढे अनुदान मिळणार आहे.
अर्जदार शेतकरी असणे, शेती हे उत्पन्नाचे मुख्य साधन असणे, फार्मर आयडी व वैध पासपोर्ट असणे आवश्यक आहे. तसेच यापूर्वी शासकीय अर्थसहाय्याने विदेश अभ्यास दौऱ्याचा लाभ घेतलेला नसावा.
इच्छुक व पात्र शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज 15 ऑगस्ट 2026 पर्यंत संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले असल्याचे कृषी उपसंचालक मधुगंगा जुलमे यांनी कळविले आहे.
































