जल, जंगल, जमिनीवर पहिला अधिकार आपला- अम्ब्रिशराव

नवीन लोहखाणीवर सविस्तर चर्चा

एटापल्ली : तालुक्यातील पिपली/बुर्गी येथे प्रस्तावित ओम साईराम कंपनीच्या लोहखाणीमुळे येणाऱ्या अडचणी आणि समस्यांवर चर्चा करण्यासाठी माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी पिपली गावाला भेट देत नागरिकांशी संवाद साधला.

नवीन कंपनीमुळे प्रभावित होणाऱ्या पिपली, जवेली, कुंडम, जिजावंडी, बुर्गी, वेडमागड, गणपहाडी, नैणवाडी व टोला या गावांतील शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला, तसेच स्थानिक युवकांना प्राधान्याने योग्य पदावर रोजगाराची संधी मिळावी, याशिवाय रस्ते, शिक्षण व आरोग्य सुविधांबाबत नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या.

यावेळी अम्ब्रिशराव यांनी गावकऱ्यांच्या सर्व समस्या आणि त्यांच्या अडी-अडचणी ऐकून घेतल्या. मी तुमच्या पाठीशी सदैव राहील. जल, जंगल, जमिनीचे खरे मालक तुम्ही आहात. तुमच्या सर्व समस्या या येणाऱ्या कंपनीच्या माध्यमातून तुम्हाला विश्वासात घेऊन आवश्यक कार्यवाही करण्यासाठी पाठपुरावा करू, तुमच्यावर अन्याय कदापी होऊ देणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले.

या बैठकीस संबंधित गावांतील प्रमुख नागरिक तसेच युवा नेते अवधेशराव आत्राम, भाजपचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते, आणि नागरिक उपस्थित होते.