गडचिरोली : शिवसेना (उबाठा)मध्ये नव्याने झालेल्या खांदेपालटानंतर जिल्हा कार्यालयातील काही साहित्य काढून कार्यालयाचे नुकसान केल्याचे प्रकरण पोलिसात गेले. नवनियुक्त जिल्हा प्रमुख पवन गेडाम यांच्या तक्रारीवरून माजी जिल्हाप्रमुख वासुदेव शेडमाके आणि गणेश धोटे यांच्याविरूद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
13 जूनला पक्षातील नेतृत्वबदलाचे वृत्त पसरताच मावळते जिल्हाध्यक्ष वासुदेव शेडमाके यांच्या समर्थकानी जिल्हा कार्यालयातील पंखे, खुर्च्या, लाईट असे विविध साहित्य काढून घेतले. यात कार्यालयाचे 30 ते 40 हजारांचे केल्याची तक्रार पवन गेडाम यांनी केली.
हे साहित्य शेडमाके यांनी लावलेले होते, ते त्यांनी काढून घेतल्याचे त्यांच्या समर्थकांनी सांगितले. मात्र वर्चस्वाच्या लढाईतून आकसपणे त्यांनी हे कृत्य करत कार्यालयाचे नुकसान केल्याचा आरोप नवीन जिल्हाप्रमुखांनी केला. दरम्यान या प्रकरणाची धग मुंबईपर्यंत पोहोचली असून हे प्रकरण निस्तारण्यासाठी पक्षाने माजी संपर्कप्रमुख किशोर पोतदार यांना गडचिरोलीला रवाना केल्याचे सांगितले जाते.
































