गडचिरोली : जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे बनावट लेटरहेड आणि त्यावर त्यांची खोटी स्वाक्षरी करून तब्बल 4 कोटी रुपयांच्या बनावट प्रशासकीय मान्यता तयार केल्याप्रकरणी अखेर मुख्य सूत्रधार म्हणून चामोर्शी नगर पंचायतचे स्वीकृत नगरसेवक आशिष पिपरे यांना अटक करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर येथे रविवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास अटक केल्यानंतर सोमवारी संध्याकाळी 5 च्या सुमारास त्यांना गडचिरोलीच्या जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले.
यावेळी पिपरे यांच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद करत पिपरे यांची पोलीस कोठडी टाळण्याचा प्रयत्न केला, पण सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी अनिकेत हिरडे (आयपीएस) यांनी त्यांचा युक्तीवाद खोडून काढत पोलीस कोठडीची मागणी केली. त्यामुळे न्या.सदाफळे यांनी प्रकरणाचे गांभिर्य ओळखून पिपरेला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
जिल्हा खनिज प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या सहीच्या 4 कोटी रुपयांच्या कामांच्या बनावट प्रशासकीय मान्यता संगणकावर तयार करून त्याच्या पीडीएफ फाईल्स पिपरे याने तयार केल्या होत्या. त्या बनावट पत्राच्या पीडीएफ फाईल कंत्राटदारांना दाखवत काम मिळवून देण्याच्या नावाखाली पैसे लाटण्याचा प्रयत्न केल्याचा पोलिसांचा संशय आहे.
या प्रकरणाचे तांत्रिक पुरावे गोळा केल्यानंतर या प्रकरणाचे धोगेदोरे आशिष पिपरे याच्यापर्यंत पोहोचले. यापूर्वी अगरबत्ती प्रकल्पात काही महिलांची आर्थिक फसवणूक केल्याचाही पिपरेवर आरोप होता. मात्र कागदोपत्री पिपरे याच्याविरूद्ध कोणतेही पुरावे नसल्याने त्या प्रकरणात पिपरेवर कारवाई झाली नाही. मात्र यावेळी तपास अधिकारी म्हणून स्वत: सहायक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांनी पुराव्यांसह पिपरे याला घेरले. त्यामुळे आशिष पिपरे यात चांगलेच फसल्या जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
या प्रकरणात पिपरे याच्यासोबत आणखी कोणी आहे का, किंवा त्याने कोणाची आर्थिक फसवणूक केली आहे का, हे तपासात पुढे येईल. पिपरे यांच्या पत्नी चामोर्शीत भाजपच्या नगरसेविका आहे. पिपरे स्वत: भाजपच्या सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष होते. मात्र अगरबत्ती प्रकरणानंतर त्यांची उचलबांगडी झाली होती.
































