Home दैनंदिन बातम्या शाळा प्रवेशोत्सवात प्रभातफेरी, बग्गी मिरवणुकीने विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

शाळा प्रवेशोत्सवात प्रभातफेरी, बग्गी मिरवणुकीने विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी

गडचिरोली : नवीन शैक्षणिक वर्षाची सुरूवात मंगळवारी जिल्ह्यातील शाळांमध्ये प्रवेशोत्सवाच्या कार्यक्रमाने उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली. जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आणि आदिवासी विकास विभागाच्या पुढाकारातून जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प, प्रभातफेरी, मिरवणुका काढून स्वागत करण्यात आले. पहिल्याच दिवशी नवीन पाठ्यपुस्तके मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण होते. शिक्षणाच्या नव्या प्रवासाला प्रेरणादायी सुरुवात करताना मान्यवरांनी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन केले. (अधिक बातमी खाली वाचा)

घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांचे स्वागत

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुरखळा, तसेच आदिवासी विकास विभागाच्या शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेत उपस्थित राहून नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. त्यांना विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करून शैक्षणिक प्रवासाला शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी मुरखळा येथे इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याच्या घरी जाऊन पुष्पगुच्छ देत त्याचे स्वागत केले. त्यानंतर प्रभातफेरी आणि वाजतगाजत विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यात आले. विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

‘शिक्षण ही दररोजची तपस्या’

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी पंडा म्हणाले की, शाळेचा पहिला दिवस हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. या दिवशी विद्यार्थ्यांप्रमाणेच पालकांच्याही मनात अनेक अपेक्षा आणि भविष्याची स्वप्ने असतात. मात्र आज विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये दिसणारा उत्साह निश्चितच आशादायी असून तो गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी पोषक वातावरण निर्माण करणारा आहे. शिक्षण ही एका दिवसाची गोष्ट नसून ती दररोजची तपस्या आहे. केवळ परीक्षेपूर्वी अभ्यास करून यश मिळत नाही. विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास, शिस्त, जिज्ञासा आणि एकाग्रतेच्या बळावर ज्ञान संपादन केले पाहिजे. शाळेत येऊन केवळ पाठ्यपुस्तकांचे ज्ञान घेणे पुरेसे नाही, तर बौद्धिक, मानसिक आणि कौशल्य विकासालाही तितकेच महत्त्व दिले पाहिजे, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

विद्यार्थ्यांनी नियमित शाळेत उपस्थित राहून मित्र, शिक्षक आणि परिसरातून चांगल्या गोष्टी आत्मसात कराव्यात, तसेच दररोजच्या अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन त्यांनी केले. शिक्षक आणि पालकांनी मुलांमध्ये शिस्त, सकारात्मकता, आत्मविश्वास आणि चांगले संस्कार रुजवून त्यांना सक्षम नागरिक म्हणून घडवावे, असेही ते म्हणाले.

विश्राम कक्षाचे उद्घाटन

मुरखळा येथील शाळेत विद्यार्थिनींसाठी मासिक पाळीदरम्यान विश्रांतीची सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या विश्राम कक्षाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते करण्यात आले. या सुविधेमुळे विद्यार्थिनींना शालेय शिक्षण अधिक सुलभ व अनुकूल वातावरणात घेता येणार आहे. कार्यक्रमाला मुरखळाचे सरपंच दशरथ चांदेकर, केंद्रप्रमुख, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे जगदीश चौधरी व इतर पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

आश्रमशाळेत बग्गीतून स्वागत

आदिवासी विकास विभागाच्या शासकीय इंग्रजी माध्यम आश्रम शाळा, गडचिरोली येथे नव्याने प्रवेश घेतलेल्या इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची आकर्षक बग्गीतून मिरवणूक काढून उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी अरुण एम. उपस्थित होते.

जिल्हाभरात मान्यवरांची उपस्थिती

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, मेंढा येथे तर पोलीस अधीक्षक एम.रमेश यांनी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, गोगाव येथे उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले.