मुलचेरा : महायुतीच्या सर्व घटकांना सोबत आणि विश्वासात घेऊन तालुक्यातील सर्व विकासकामे तातडीने पूर्ण करा, असे स्पष्ट निर्देश माजी मंत्री तथा आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी दिले. मुलचेरा पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित आढावा सभेत ते बोलत होते. या बैठकीत विविध विभागातील विकास कामांचा सविस्तर आढावा त्यांनी घेतला. तसेच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती युधिष्टीर बिश्वास, पंचायत समितीच्या माजी सभापती सुवर्णा येमूलवार, गटविकास अधिकारी विजय पेंदाम, नगरपंचायतचे उपाध्यक्ष मधुकर वेलादी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते रंजित स्वर्णकार, सरपंच जया मंडल, मनोज बंडावर, अमित मुजुमदार, निखिल इज्जतदार आदी उपस्थित होते.
आढावा सभेत आ.आत्राम यांनी घरकुल योजना, बांधकामाची कामे आणि इतर विभागातील प्रलंबित प्रकल्पांची स्थिती जाणून घेतली. विशेषतः घरकुल योजनेअंतर्गत आणि काही ठिकाणी पूर्ण झालेल्या बांधकामांचे बिल अद्याप न मिळाल्याच्या तक्रारी समोर आल्या. यावर आमदारांनी संबंधित अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. प्रलंबित बिले अदा करा आणि विकासकामांना गती द्या, असे त्यांनी बजावले. सर्वसामान्य नागरिकांना त्रास देऊ नका, असा इशाराही धर्मरावबाबांनी दिला. उन्हाळ्याचा काळ सुरू झाला असून, पाण्याची टंचाई होणार नाही याकडे सर्व विभागांनी विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश त्यांनी दिले.
शासनाच्या सर्व लोककल्याणकारी योजनांचा प्रभावीपणे प्रचार करून प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत योजना पोहोचवण्यासाठी पुढाकार घ्या, असेही त्यांनी सांगितले. शेवटच्या घरापर्यंत योजनांचा लाभ पोहोचावा, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, अशी सूचना करण्यात आली.
या आढावा सभेमुळे तालुक्यातील विकासकामांना वेग येईल आणि नागरिकांच्या समस्या सोडवल्या जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मुलचेरा तालुक्यातील विविध गावांमधील पाणीपुरवठा, रस्ते, बांधकाम आणि इतर मूलभूत सुविधांसाठी या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
































