मार्कंडादेवच्या वैनगंगा घाटाची निरंकारी मिशनकडून स्वच्छता

200 भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग

गडचिरोली : सद्गुरु बाबा हरदेवसिंह महाराज यांच्या वचनानुसार स्वच्छता हे मानवाच्या शारीरिक व आध्यात्मिक उन्नतीचे साधन आहे. या उदात्त हेतूने ‘प्रोजेक्ट अमृत’अंतर्गत स्वच्छ जल, स्वच्छ मन या स्वच्छता उपक्रमाचे आयोजन निरंकारी मिशन नवी दिल्लीच्या चामोर्शी शाखेच्या वतीने मार्कंडादेव येथे करण्यात आले. महाशिवरात्रीच्या जत्रेनंतर वैनगंगा नदीघाटावर रविवारी सुमारे 200 निरंकारी भाविकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत नदीघाट स्वच्छ केला.

या स्वच्छता उपक्रमाचे उद्घाटन शासकीय माध्यमिक आश्रमशाळा मार्कंडादेवचे मुख्याध्यापक प्रमोद वरगंटीवार यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चामोर्शी येथील संत निरंकारी मंडळाचे देवनाथ धोडरे होते. याशिवाय प्रमुख अतिथी म्हणून मार्कंडादेवच्या सरपंच संगीता मोगरे, पोलीस पाटील आरती आभारे, उपसरपंच उमाकांत जुनघरे, राजू मोगरे, कोमरू मिडपल्लीवर, संभाजी भुरसे, सुधाकर लोणारे, चिन्नाजी करेवार, मारोती कोरीवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

संत निरंकारी मिशन चामोर्शीच्या वतीने आयोजित केलेल्या पाणीघाट स्वच्छता अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रास्ताविक भोजराम लंजे यांनी केले. संचालन प्रफुल गव्हारे तर आभार प्रदर्शन फुलचंद गेडाम यांनी केले. या स्वच्छता अभियानाच्या यशस्वीतेसाठी निरंजना रामटेके, वंदना ढोडरे, नाजूक येलमुले, रवींद्र बुरांडे, घनश्याम बोधलकर, घनश्याम वासेकर, वसंत वासेकर, प्रभाकर कळसकर, सुभाष मिडपलीवार, मारोती लेनगुरे, अशोक पुल्लिवार, प्रभाकर गव्हारे, बालाजी गव्हारे आदींनी सहकार्य केले.