Home क्राईम सिनेस्टाईल पाठलाग करत जंगलात पकडले दारूने भरलेले वाहन

सिनेस्टाईल पाठलाग करत जंगलात पकडले दारूने भरलेले वाहन

8.24 लाखांचा मुद्देमाल केला जप्त

गडचिरोली : अवैधपणे छुप्या रितीने दारूची वाहतूक करणाऱ्या एका वाहनाला सहायक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे व त्यांच्या पथकाने चामोर्शी पोलीस स्टेशनच्या हद्दीत पकडले. हे वाहन पोलिसांना गुंगारा देऊन पळून जात होते. मात्र सिनेस्टाईल पाठलाग करत त्या वाहनाला गाठण्यात पोलिसांना यश आले. या कारवाईत वाहनासह
एकूण 8 लाख 24 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. (अधिक बातमी खाली वाचा)

एका एसयुव्ही वाहनाने (एम.एच. 49, ए.ई. 5925) अवैधरित्या देशी-विदेशी दारुची वाहतूक केली जाणार असल्याची माहिती अनिकेत हिरडे यांना गोपनिय सूत्रांकडून मिळाली होती. त्यात माहितीवरुन हिरडे व त्यांच्या पथकाने मौजा कुनघाडा फाटा येथे सापळा रचला होता. सदर संशयास्पद चारचाकी वाहन येताना दिसून आल्याने वाहनास अडविण्याचा प्रयत्न केला असता, आरोपी राजेंद्र सपन मंडल याने यु-टर्न घेऊन रस्त्यावरील एका अन्य चारचाकी वाहनास धडक देऊन पळ काढला. त्यानंतर सहा.पोलीस अधीक्षक गडचिरोली हिरडे व त्यांच्या पथकाने त्यांचे वाहन अडकले असताना एका खाजगी वाहनाला थांबवून, लोकांना विचारत, तसेच आरोपीच्या वाहनाच्या टायरच्या खुणांची पाहणी करत संशयित गाडीचा पाठलाग सुरू केला. आरोपी हा आपल्या ताब्यातील वाहन मौजा पोटेगावच्या दिशेने नवरगाव जंगल परिसरात उभे करून जंगलाचा फायदा घेत पसार झाला होता.

पोलीस पथकाने पंचासमक्ष सदर चारचाकी वाहनाची तपासणी केली असता, त्यात रॉकेट देशी दारु संत्रा कंपनीच्या 3500 नग प्लास्टिक सिलबंद बॉटल (अंदाजे किंमत 2,80,000 रुपये), 500 मि.ली. मापाच्या 24 नग बिअरच्या सिलबंद पत्र्याच्या कॅन (अंदाजे किंमत 7,200 रुपये) 180 एम.एल. मापाचे रॉयल स्टॅग कंपनीच्या 48 नग काचेच्या सिलबंद निपा (अंदाजे किंमत 16,800 रुपये) 90 मि.ली. मापाच्या रॉयल स्टॅग कंपनीच्या 100 नग काचेच्या सिलंबद निपा (20,000 रुपये) व अवैद्य देशी-विदेशी दारूची वाहतूक करण्याकरिता वापरण्यात आलेले चारचाकी वाहन (किंमत अंदाजे 5,00,000 रुपये) असा एकूण 8 लाख 24 हजार रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळावरून जप्त करण्यात आला.

आरोपी राजेंद्र सपन मंडल (27 वर्षे), रा.कुनघाडा, ता.चामोर्शी याच्याविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम.रमेश यांच्या आदेशान्वये सहायक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे व त्यांच्या पथकाने पार पाडली.