Home दैनंदिन बातम्या वर्षभरात 2075 क्षयरुग्णांची भर, महिन्याकाठी 1 हजारांचे अनुदान

वर्षभरात 2075 क्षयरुग्णांची भर, महिन्याकाठी 1 हजारांचे अनुदान

दोन तासात होते टीबीचे निदान

गडचिरोली : आज (दि.24 मार्च) हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. क्षयरोगाचे उच्चाटन करण्यासाठी देशपातळीवर राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम राबविला जात आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्यात 2025 या वर्षभरात शासकिय रुग्णालये आणि खाजगी रुग्णालये मिळून एकूण 2075 क्षयरुग्ण शोधुन काढण्यात आले आहेत. त्यांना पोषण आहारासाठी सरकारच्या वतीने महिन्याकाठी 1 हजार रुपयांचे अनुदानही दिले जात आहे.

आरोग्य विभागाची यंत्रणा महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावागावात पोहोचलेली आहे. त्यामुळे अनेक रोगांचे समुळ उच्चाटन करण्यात यश आले आहे. परंतु क्षयरोगावर अद्यापही पुर्णपणे नियंत्रण ठेवणे शक्य झालेले नाही. एक क्षयरुग्ण उपचाराविना राहीला तर तो वर्षभरामध्ये त्याच्यासारखे 15 रुग्ण तयार करत असतो. राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत 2030 पर्यंत भारतातून क्षयरोग नष्ट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

अशी आहेत लक्षणे
क्षयरोगाच्या लक्षणांमध्ये दोन आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त दिवसाचा खोकला, संध्याकाळी हलकासा ताप, वजनात घट होणे, भूक मंदावणे, छातीत दुखणे, थुंकीतून रक्त पडणे ही लक्षणे दिसुन आल्यास क्षयरोगाचा संशयित रुग्ण समजावा. तसेच थुंकी दुषित क्षयरोग रुग्णाच्या सहवासात असणारे व्यक्ती, कुपोषित, प्रतिकार शक्ती कमी असणारे व्यक्ती, मधुमेह असणारे व्यक्ती, दीर्घकालीन आजारी, वृध्द व्यक्ती इत्यादींना क्षयरोग आजार होण्याची शक्यता असते.

संपूर्ण देशात दररोज 5000 लोकांना क्षयरोगाची लागण होते आणि दर दिड मिनीटाला एका व्यक्तीचा क्षयरोगाने मृत्यू होतो. तरुण व कमावत्या वर्गामध्ये या रोगाची लागण मोठ्या प्रमाणावर आढळून येते.
क्षयरोगाचे निदान झाल्यानंतर उपचारावर येणाऱ्या रुग्णास दरमहा 1 हजार रुपये डीबीटी स्वरुपात निक्षय पोषण योजनेव्दारे औषधोपचार पुर्ण होईपर्यंत देण्यात येतात. रुग्णांनी चांगला पौष्टीक आहार घ्यावा हा त्यामागे उद्देश आहे.

आता दोन तासात निदान
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत सर्व क्षयरुग्णांना त्यांच्या वजनानुसार मोफत औषधोपचार पुरविल्या जातो. तसेच टिबीच्या निदानासाठी क्षय रुग्णालयात एलईडी सुक्ष्मदर्शी (LED) Microscope), अत्याधुनिक यंत्र व सिबीनॅट (CBNAAT), तसेच ट्रूनॅट यंत्र उपलब्ध असून या यंत्राव्दारे अवघ्या दोन तासात क्षयरोगाचे निदान करणे शक्य झालेले आहे. क्षयरोग निदानाकरीता उपलब्ध असलेल्या या उपचार पध्दतीचा लाभ घेऊन गडचिरोली जिल्हयाला भविष्यात क्षयरोगमुक्त करण्याचे आवाहन जिल्हा क्षयरोग नियंत्रण समितीच्या वतीने जिल्हाधिकारी अविशांत पंडा, सीईओ सुहास गाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.वर्षा लहाडे, तसेच जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.सचिन हेमके यांनी केले आहे.