
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, महिला, युवक, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध गंभीर प्रश्नांवर थेट संवाद साधण्यासाठी क्रांती दिन (दि.9) ते स्वातंत्र्य दिन (दि.15) या कालावधीत गडचिरोलीत ‘चरखे के पास चर्चा’ या लोकसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची सुरुवात रविवारी गडचिरोलीतील राजीव गांधी सभागृहात आमदार अभिजीत वंजारी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.

शेतकरी संघर्ष कृती समितीचे संयोजक महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात सुरू करण्यात आलेल्या या लोकसंवादात अनेक मान्यवर दररोज मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी बोलताना आ.अभिजित वंजारी म्हणाले, लोकशाहीत एकतर्फी संवाद नको. पण पंतप्रधान ‘मन की बात’ करताना ‘जन की बात’ ऐकून घेत नाही. या अनोख्या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांना आपले म्हणने मांडण्याची संधी मिळेल. यातून जिल्ह्यातील समस्यांना वाचा फुटेल, असे आ.वंजारी म्हणाले. चरखा हे महात्मा गांधींच्या विचारांचे प्रतिक आहे. त्यामुळे चरख्याला साक्षी ठेवून त्यांच्या विचाराप्रमाणे लोकशाही मार्गाने जिल्ह्यातील समस्यांवर लढण्याची प्रेरणा यातून मिळणार असल्याचे ते म्हणाले.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर नागरिक, शेतकरी, युवक, महिला, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्याशी थेट संवाद साधला जाणार आहे. आज दि.10 रोजी ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे हे मार्गदर्शन करणार आहेत.
‘चरखे के पास चर्चा’ या उपक्रमाच्या माध्यमातून सात दिवस जिल्ह्यातील विविध तालुके व भागांतील नागरिकांच्या समस्या, शेतजमिनींचे प्रश्न, रोजगार, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, महिला व युवकांचे प्रश्न तसेच जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासंदर्भात विचारमंथन करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.विश्वजीत कोवासे, दिवाकर निसार, प्रभाकर वासेकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष सतीश विधाते, अखिल भारतीय आदिवासी काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव कुसुम आलाम, नगरसेविका मेघा वरगंटीवार, मनीषा खेवले, माजी जि.प. सदस्य कविता भगत, पुष्पलता कुमरे, जिल्हा उपाध्यक्ष नेताजी गवतुरे, जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव सालोटकर, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे, चामोर्शी तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटीचे प्रमोद भगत, जिल्हाध्यक्ष पर्यावरण विभाग राजेश ठाकूर, गजानन नैताम, ढिवरू मेश्राम, हरबाजी मोरे, गुरुवळाचे उपसरपंच अनिल कोठारे, उत्तम ठाकरे, पांडुरंग घोटेकर, गजानन नैताम, दत्तात्रय खरवडे, रुपेश टिकले, रजनीकांत मोटघरे, रोडे महाराज, विजय लाड, जितेंद्र मुनघाटे, विपुल येलटीवार, गौरव येनप्रेड्डीवार, संजय मेश्राम, महादेव भोयर, रीता गोवर्धन, कविता उराडे, सुधीर बांबोळे, प्रफुल बारसागडे, तेजस कोंडेकर , यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी, युवक, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
































