Home दैनंदिन बातम्या गडचिरोली पोलिसांकडून विविध विद्यार्थी-युवांना साहित्याचे वितरण

गडचिरोली पोलिसांकडून विविध विद्यार्थी-युवांना साहित्याचे वितरण

जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य

गडचिरोली : जागतिक आदिवासी दिनानिमित्त गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने अतिदुर्गम भागातील शालेय विद्यार्थी व युवक-युवतींना सायकल, शैक्षणिक साहित्य व स्वयंरोजगार साहित्याचे वितरण करण्यात आले. पोलीस अधीक्षक एम.रमेश यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली पोलीस मुख्यालयातील एकलव्य हॉलमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

जिल्ह्यातील युवक-युवतींना शिक्षण, कौशल्य विकास तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून प्रोजेक्ट उडान अंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला 300 हून अधिक शालेय विद्यार्थी, युवक-युवती व नागरिक उपस्थित होते.

यावेळी पोलीस अधीक्षकांच्या हस्ते अतिदुर्गम भागातील एकूण 90 शालेय विद्यार्थ्यांना सायकलींचे, तसेच इतर विद्यार्थ्यांना शालेय साहित्य (स्कुल बॅग, पेन, कंपास) इ. साहित्यांचे वाटप करण्यात आले. गडचिरोली पोलीस दलाच्या “पोलीस दादालोरा खिडकी” च्या माध्यमातून गडचिरोली पोलीस दल व बिओआय आरसेटी गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने इच्छुक युवक-युवतींना 30 दिवसाचे टु-व्हिलर रिपेअरींगचे व 12 दिवसांचे फास्टफुडचे प्रशिक्षण देण्यात येते. या कार्यक्रमप्रसंगी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 60 प्रशिक्षणार्थ्यांना टु-व्हिलर व फास्टफुड व्यवसाय सुरु करण्याकरीता आवश्यक किटचे वाटप करण्यात आले. यासोबतच 3 बचत गटांना वाद्य साहित्य संचाचे देखील वाटप करण्यात आले. या साहित्यामुळे दुर्गम भागातील युवक-युवतींना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात पुढे जाण्यास प्रोत्साहन मिळणार असून, त्यांना स्वावलंबी होण्यास मदत मिळणार आहे.

या कार्यक्रमादरम्यान पोलीस अधीक्षक एम.रमेश यांनी उपस्थित विद्यार्थी आणि नागरिकांना संबोधित करताना सांगितले की, ‘पोलीस आणि नागरिकांच्या समन्वयामुळे गडचिरोली जिल्ह्रातील माओवादी चळवळ आता संपुष्टात आलेली आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणावर सर्वाधिक लक्ष केंद्रीत करत मेहनत घ्यावी, तसेच प्रशिक्षण पूर्ण करणा­ऱ्या युवक-युवतींनी या साहित्यांच्या माध्यमातून स्वावलंबी बनून आपली आर्थिक उन्नती साधत आत्मनिर्भर व्हावे. पोलीस दल नेहमीच नागरिकांच्या सर्व अडचणी सोडविण्यासाठी आणि त्यांच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्द आहे, असे ते म्हणाले.

या कार्यक्रमाला अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., सहा.पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि.चंद्रकांत शेळके व सर्व अंमलदारांनी परिश्रम घेतले.