Home दैनंदिन बातम्या वाघासोबत झुंजणाऱ्या बिबट्याचा चांभार्डा परिसरात अखेर मृत्यू

वाघासोबत झुंजणाऱ्या बिबट्याचा चांभार्डा परिसरात अखेर मृत्यू

मृत्यूपूर्वी केला चार जणांवर हल्ला

जखमींना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी नेताना.
जिल्हा सामान्य रुग्णालयात जखमींची विचारपूस करताना अरविंद कात्रटवार

गडचिरोली : तालुक्यातील चांभार्डा येथे बुधवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास वाघ आणि बिबट्यांमध्ये भीषण लढाई झाली. अर्थात या झुंजीत बिबट्या गंभीर जखमी झाला. तो जखमी अवस्थेत एका जागी पडून असल्याने त्याच्या जवळ जाऊन पाहण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि शेतात जाणाऱ्या नागरिकांवर त्याने अचानक हल्ला केला. यात चार जण जखमी झाले. त्यापैकी तिघांना गंभीर इजा झाली आहे. दरम्यान गंभीर जखमी झालेल्या बिबट्याचाही काही वेळानंतर मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, वाघ आणि बिबट्या यांच्यात झालेल्या संघर्षात वाघ वरचढ ठरल्यानंतर तो विजयी झाल्याच्या आनंदात जंगलात गेला. पण गंभीर जखमी झाल्याने बिबट्या कुठे जाऊ शकत नव्हता. जखमी अवस्थेत तो परिसरातच पडून असल्याने काही नागरिकांनी उत्सुकतेपोटी त्याच्या जवळ जाऊन पाहण्याचा प्रयत्न केला. याचवेळी अचानक बिबट्याने आक्रमक होऊन चौघांवर हल्ला केला.

या घटनेत विलास ठाकरे (48 वर्ष), रेखा विठ्ठल मडावी (45 वर्ष) दोघेही रा.चांभार्डा, तसेच लुमाजी मुनघाटे (40 वर्ष, रा.टेंबा) हे चांगलेच जखमी झाले. तर लिलाधर मुनघाटे (37 वर्ष, रा.चांभार्डा) हे किरकोळ जखमी झाले. जखमींना तत्काळ अमिर्झा येथील आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले.

या झुंजीनंतर बिबट्याचा काही वेळानंतर मृत्यू झाला. वाघाच्या हल्ल्यात बिबट्याचा चेहरा आणि डोळ्यांवर गंभीर जखमा झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले जाते. ज्या ठिकाणी ही घटना घडली ते क्षेत्र पोरला वनपरिक्षेत्रात आणि वडसा वनविभागाच्या कार्यकक्षेत येते. मात्र या गंभीर घटनेबाबत वडसा वनविभागाने जनजागृतीसाठी कोणताही पुढाकार घेतला नाही.

अरविंद कात्रटवार यांनी घेतली भेट

मौशीखांब-मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील चांभार्डा भागातल्या चार नागरिकांवर बिबट्याने हल्ला केल्याची माहिती मिळताच अरविंद कात्रटवार यांनी तातडीने रूग्णालयात धाव घेऊन जखमींची विचारपूस केली. जखमींवर योग्य ते उपचार करण्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगितले. तसेच जखमींना आधार देत आवश्यक ती मदत केली जाईल अशी ग्वाही दिली.

मौशीखांब-मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील जंगल परिसरात वाघ व बिबटयांचा वावर आहे. चांभार्डा येथे वाघ आणि बिबट्याच्या झुंजीत जखमी झालेल्या बिबटयाने अचानक एक महिलेसह चार जणांवर हल्ला केला. या घटनेची वनविभागाने गांभिर्याने दखल घेऊन जखमींना तातडीने आर्थिक मदत करावी, आणि वाघ आणि बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी कात्रटवार यांनी वनविभागाकडे केली.