Home दैनंदिन बातम्या ईडा-पिडा टाळण्यासाठी आता राष्ट्रवादीचा विडा उचला- आ.आत्राम

ईडा-पिडा टाळण्यासाठी आता राष्ट्रवादीचा विडा उचला- आ.आत्राम

कुरखेडात राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा

कुरखेडा : आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची होऊ घातलेली निवडणूक प्रत्येक समाजातील घटकाच्या जीवनाविषयी निगडीत आहे. एससी, एसटी, ओबीसी व डतरही समाजातील घटकाने आपल्या कुटुंबाचा व समाजाचा विकास करायचा असेल तर जि.प. आणि पं.स.ची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातात द्या. ईडा, पिडा टाळण्यासाठी आता राष्ट्रवादीचा विडा उचला, असे भावनिक आवाहन आमदार डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांनी कुरखेडा येथे आयोजित पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात केले.

येथील किसान मंगल कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात माजी आमदार डॉ.रामकृष्ण मडावी, जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष तथा विद्यापीठाच्या सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा गडचिरोली न.प.चे सभापती लिलाधर भरडकर, जिल्हा कार्यकारी अध्यक्ष नंदू नरोटे, नाना नाकाडे, युनूस शेख, किशोर तलमले, बी.के. लोणारे, रिंकू पापडकर, समय्या पसुला, सुनील नंदनवार, देसाईगंज न.प.सभापती पिंकू बावणे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आ.डॉ. आत्राम म्हणाले, मी सर्व जिल्हा पिंजून काढत आहे. गोरगरिबांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रत्येक तालुक्यात जाऊन त्या समस्यांचे निराकरण करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून खेड्यापाड्यातील समस्या घेऊन शासन दरबारी त्या मांडणार, असे अभिवचन देत असल्याचे ते म्हणाले.

या मेळाव्यात इतरही मान्यवरांची समायोचित भाषणे झाली. कार्यक्रमाला तालुक्यातील सरपंच-उपसरपंच, सदस्य ग्रामसभेचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन मोहन पुराम, प्रास्ताविक बी.के.लोणारे तर आभार राम लांजेवार यांनी मानले.