गडचिरोली : ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण’ योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण करूनही रोजगारापासून वंचित असलेल्या आणि निवडणूकपूर्व काळात ‘लाडके भाऊ’ म्हणून गाजावाजा झालेल्या युवा प्रशिक्षणार्थ्यांना बेरोजगारीची झळ सहन करावी लागत आहे. त्यामुळे आम्हाला कंत्राटी स्वरूपात का असेना, पण सेवेत घेऊन विविध सरकारी कार्यालयांमधील रिक्त पदे भरा, अशी मागणी युवा प्रशिक्षणार्थींनी गडचिरोलीत भर उन्हात मोर्चा काढून केली. गडचिरोली जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थीही या मोर्चात सहभागी झाले होते.
विधानसभा निवडणुकीपूर्वी आणलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत बेरोजगारांची 10 हजार रुपये मासिक मानधनावर 6 महिने सरकारी कार्यालयांमध्ये सेवा घेण्यात आली. सहा महिन्यानंतर ते युवक-युवती पुन्हा बेरोजगार झाले. वास्तविक अनेक सरकारी कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त असल्यामुळे युवा प्रशिक्षणार्थींची सेवा संबंधित कार्यालयांच्या उपयोगाची ठरली. प्रशिक्षणानंतर कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याचे आश्वासन त्यांना देण्यात आले, पण 6 महिन्यानंतर ते बेरोजगार झाले. त्या युवा प्रशिक्षणार्थींना सरकारी कार्यालयांमध्ये कंत्राटी स्वरूपात सामावून घ्यावे अशी त्यांची मागणी आहे.
सोमवारी दुपारी 1 वाजता इंदिरा गांधी चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे निवेदन देण्यात आले.
या बेरोजगार युवा प्रशिक्षणार्थींनी आतापर्यंत 23 वेळा विविध ठिकाणी आंदोलने केली. तरीही सरकार ठोस भूमिका घेण्यास तयार नसल्याची खंत या बेरोजगारांनी व्यक्त केली.































