गडचिरोली : जिल्ह्यातील ग्रामीण महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी ‘उमेद’ अभियान आणि जिल्हा प्रशासनाने एक अभिनव पाऊल उचलले आहे. जिल्हा विकास निधी आणि खनिज प्रतिष्ठानच्या निधीतून सहा महिला प्रभाग संघांना ‘घाटो कट्टा’, अर्थात फूड व्हॅन या फिरत्या रेस्टॉरंटचे वितरण करण्यात आले. हा उपक्रम संपूर्ण राज्यासाठी एक पथदर्शक ‘मॉडेल’ ठरेल, असा विश्वास सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी व्यक्त केला.
ग्रामीण अर्थव्यवस्थेला मिळणार बळ
सुरजागड लोहप्रकल्पामुळे बाधित झालेल्या अहेरी आणि एटापल्ली तालुक्यातील महिलांना शाश्वत रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या फिरत्या व्हॅनच्या माध्यमातून महिलांना केवळ रोजगारच मिळणार नाही, तर त्यांच्या दरडोई उत्पन्नात वाढ होऊन त्या स्वयंपूर्ण होतील, असे प्रतिपादन सहपालकमंत्र्यांनी केले.
‘घाटो कट्टा’ उपक्रमाची ठळक वैशिष्ट्ये
महिला बचत गटांना 1 लाख रुपये देण्याची योजना जिल्ह्यात यशस्वीपणे राबवली जात असून, ‘घाटो कट्टा’ त्यापुढील महत्त्वाचा टप्पा आहे. या व्हॅनचे संचालन पूर्णपणे महिलांकडे असून, त्या स्वतः व्हॅन चालवतील आणि सकस आहार तयार करतील. यासाठी महिलांना आर-सेटी (R-SETI) मार्फत वाहन चालविण्याचे आणि विविध खाद्यपदार्थ बनवण्याचे व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात आले आहे. लोहप्रकल्प परिसरातील वाढती गर्दी लक्षात घेता, अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांना या व्हॅनद्वारे शुद्ध आणि पौष्टिक आहार वाजवी दरात उपलब्ध होईल.
“जिल्हा नियोजन समितीच्या 3 टक्के राखीव निधीतून आणि जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा हा गडचिरोली पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्र फॉलो करेल. नारीशक्तीला आत्मनिर्भर करण्यासाठी प्रशासनाने केलेले हे काम कौतुकास्पद आहे,” असे मत यावेळी सहपालकमंत्री जयस्वाल यांनी व्यक्त केले.
खनिज प्रतिष्ठानकडून 88 लाखांचा निधी
या उपक्रमासाठी जिल्हा खनिज प्रतिष्ठानकडून सुमारे 88 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. एका व्हॅनची किंमत जवळपास 14 लाख रुपये असून त्यात सर्व आधुनिक सोयीसुविधांचा समावेश आहे. गडचिरोली जिल्हा प्रशासनाच्या या प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील दुर्गम भागातील महिला आता व्यावसायिक क्षेत्रात आपली ओळख निर्माण करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. यावेळी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, पोलीस अधीक्षक एम. रमेश, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी राहूल काळभोर, तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, उमेद अभियानाचे प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने महिला बचत गटाच्या सदस्य उपस्थित होत्या.






























