

गडचिरोली : गडचिरोली शहरालगतच्या भागात होऊ घातलेल्या प्रस्तावित विमानतळासाठी पूर्वी निवडलेली नवेगाव-मुरखडा भागातील जागा शेतकऱ्यांच्या विरोधानंतर रद्द केल्याने आता इतर तीन ठिकाणच्या पर्यायांची चाचपणी केली जात आहे. त्यात मौजा राखी, गुरवळा, हिरापूर आणि शिरपूर या चार गावांच्या परिसरामिळून असलेल्या एका पर्यायाची चाचपणी करण्यासाठी गुरूवारी विमान प्राधिकरणचे पथक शिरपूरमध्ये दाखल झाले होते. पण गावकऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे त्यांना आल्यापावली परत जावे लागले.
आमच्या सुपिक जमिनी आम्ही विमानतळच नाही तर इतर कोणत्याही प्रकल्पासाठी देणार नाही, अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेऊन सर्व्हेक्षणाला विरोध केल्याने, आलेल्या पथकाला हिरापूरमधून काढता पाय घ्यावा लागला. हा सर्व्हे म्हणजे भूसंपादनाची प्रक्रिया नसून केवळ ती जागा विमानतळासाठी योग्य आहे का याची चाचपणी आहे, असे तहसीलदार सागर कांबळे यांनी सांगत गावकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण आम्हाला जमीन द्यायचीच नाही तर सर्व्हे कशासाठी? असा प्रश्न करत गावकऱ्यांनी असंतोष व्यक्त केला.
विमानतळासाठी दुसरी पर्यायी जागा ही धानोरा रोडवरील बोदली परिसरातील, तर तिसरी जागा राजगट्टा गावाच्या परिसरातील आहे. गुरूवारी (दि.7) हिरापूरमध्ये निर्माण झालेल्या तणावानंतर सहायक जिल्हाधिकारी तथा गडचिरोलीचे उपविभागीय अधिकारी अरुण एम. यांनी संबंधित गावांचे सरपंच आणि ग्रामसचिवांना तातडीने एक पत्र पाठवून राखी, गुरवळा, हिरापूर आणि शिरपूर येथील जागेचे विमानतळासाठी सर्व्हेक्षण करण्यासंदर्भात कळविले. पण तोपर्यंत कोणतीही गावकऱ्यांना किंवा ग्रामपंचायतला या सर्व्हेक्षणाबद्दल कोणतीही पूर्वसूचना नव्हती. त्यामुळे प्रशासनाचा छुप्या पद्धतीने हे सर्व्हेक्षण करण्याचा तर डाव नव्हता ना, अशी शंका काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी उपस्थित केली. अधिकारी, लोकप्रतिनिधी कोणाच्या दबावात काम करत आहेत? असा सवालही त्यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
गडचिरोलीला शेतकरीमुक्त करायचे आहे का?
गुरूवारी (दि.7) हिरापूर आणि लगतच्या गावातील शेतकऱ्यांनी सायंकाळी गडचिरोलीत दाखल होऊन काँग्रेसच्या नेतृत्वात पत्रकारांपुढे आपली भूमिका स्पष्ट केली. पालकमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी या जिल्ह्याला नक्षलमुक्त केल्यानंतर आता संपूर्ण शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करून शेतकरीमुक्त करणार आहेत का? अशी शंका येत असल्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे म्हणाले. ज्या विमानतळाचा शेतकऱ्यांना कोणताही उपयोग होणार नाही त्या विमानतळासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या जात असतील तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा ब्राह्मणवाडे यांनी शेतकऱ्यांसोबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन दिला. दरम्यान खासदार डॅा.नामदेव किरसान यांनीही या लढ्यात आम्ही शेतकऱ्यांसोबत असल्याचे स्पष्ट करत सुपिक जमिनीऐवजी झुडूपी जंगलाची जमीन घेऊन विमानतळ उभारावे, त्याला आमचा विरोध नसेल असे स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेला हिरापूरचे उपसरपंच दिवाकर निसार, राखीचे उपसरपंच अनिल कोठारे, नेताजी गावतुरे, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे, प्रल्हाद रायपुरे, ढिवरू मेश्राम यांच्यासह मोठ्या संख्येने चारही गावातील शेतकरी उपस्थित होते.





























