Home दैनंदिन बातम्या जिल्ह्यात नवीन लोहखाणींच्या सर्व्हेसाठी प्राथमिक परवानगी

जिल्ह्यात नवीन लोहखाणींच्या सर्व्हेसाठी प्राथमिक परवानगी

रत्नागिरीत पर्यायी वृक्षलागवड

गडचिरोली : जिल्ह्यातील एटापल्लीजवळील 879.73 हेक्टर वन जमिनीवर काही लोहखाणी खोदण्यासाठी सर्व्हेक्षण करण्याची परवानगी लॅायड्स मेटल्सला, तसेच इतरही खाणींच्या प्राथमिक मान्यतेसाठी केंद्रीय वन मंत्रालयाकडून परवानगी देण्यात आली आहे.

गडचिरोली जिल्ह्यात हेमाटाईट क्वार्टझाईट खडकात लोहखनिजाचे प्रमाण 40 ते 60 टक्के आहे. यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सर्वेक्षणे सुरू आहेत. एटापल्लीजवळील मोडासके आणि वालमगड परिसरात 879.73 हेक्टर वन जमिनीवर लोह संशोधन, सर्व्हे आणि खनिजे शोधण्यास महाराष्ट्र शासन आणि खाण व्यवस्थापनाने परवानगी मागितली होती, ती परवानगी काही अटींच्या माध्यमातून 27/4/2026 ला केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयाने दिली आहे. त्यात 3 इंच रुंदीचे 90 बोअरवेल, 8 हेक्टर वनजमिनीवर 20.50 किमीचे रस्ते मंजुरीस परवानगी देण्यात आली असल्याची माहिती पर्यावरण अभ्यासक प्रा.सुरेश चोपणे यांनी दिली.

वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जागेची तपासणी करून अहवाल पाठविला आहे. त्यात त्यांनी वनजमीन ही 0.6 घनतेची आणि इको क्लास 3 ची असून इथे अनेक मोठ्या प्रजातीची झाडे आणि विविध प्राणी असल्याचे अहवालात म्हटले आहे. वन्यजीव अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यान नाही, परंतु सर्व्हेसाठी 1245 झाडे तोडली जाणार आहेत. त्याची भरपाई म्हणून पर्यायी वृक्ष लागवडीसाठी रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूणजवळ 10.27 हेक्टर खाजगी जमीन प्रस्तावित करण्यात आली आहे.

लोहखाण एजन्सीने देशासाठी आणि आर्थिक प्रगतीसाठी लोहखनिज काढणे गरजेचे असल्याचे केंद्रीय मंत्रालयाला कळविले आहे. मंत्रालयाच्या समितीला प्रस्ताव आणि माहिती दिल्यानंतर समितीने काही बाबतीत सूचना आणि उपाययोजना सुचविल्या आहेत. त्यात वृक्षारोपणासाठी वनेतर जमीन आणि झुडूपी जंगल असलेली जमीन वापरण्याचे सूचविले आहे. तसेच महाराष्ट्र शासन आणि कंपनीने रस्ते, सर्व्हे, ड्रिलिंग आणि योग्य पद्धतीने सर्व्हे करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे प्रा.चोपणे यांनी सांगितले. देशासाठी उद्योग महत्वाचे असले तरी जंगल आणि वन्यजीव, पर्यावरण संरक्षणाकडे दुर्लक्ष होऊ नये असे प्रा.चोपणे म्हणाले.