गडचिरोली : जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रथमच ‘टोटल नी रिप्लेसमेंट’ (गुडघा प्रत्यारोपण) ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात अशा प्रकारची ही पहिलीच शस्त्रक्रिया असून, यामुळे जिल्ह्यातील अस्थिव्यंगाच्या रुग्णांसाठी उपचाराची नवी दारे उघडली गेली आहेत.
खासगी रुग्णालयात लाखो रुपये खर्च येणारी ही शस्त्रक्रिया आता शासकीय रुग्णालयात उपलब्ध झाल्याने दुर्गम भागातील गोरगरीब रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या यशाबद्दल बोलताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.वर्षा लहाडे म्हणाल्या की, “जिल्ह्यातील रुग्णांना दर्जेदार आणि तज्ज्ञ आरोग्य सेवा स्थानिक स्तरावरच मिळावी, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. ही पहिली यशस्वी शस्त्रक्रिया आमच्या पूर्ण टीमच्या जिद्दीचे फळ आहे.”
डॉ.वर्षा लहाडे आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.छाया उईके यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयातील अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञ, भूलतज्ज्ञ आणि ऑपरेशन थिएटरमधील सुश्रुषा कर्मचारी यांच्या चमूने यात मोलाची भूमिका बजावली. आगामी काळात अशा अनेक आधुनिक शस्त्रक्रिया रुग्णालयात नियमितपणे केल्या जातील, असा विश्वास अधिकाऱ्यानी व्यक्त केला.






























