Home राजकीय घडामोडी काँग्रेसच्या तालुका अध्यक्षांचा पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाविरूद्ध उठाव

काँग्रेसच्या तालुका अध्यक्षांचा पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाविरूद्ध उठाव

जिल्हाध्यक्ष जुनेच ठेवा, अन्यथा राजीनामे

गडचिरोली : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने गडचिरोलीत जिल्हाध्यक्षाची खांदेपालट करणे पक्षाच्या तालुकाध्यक्षांना पचनी पडलेले नाही. अॅड.विश्वजित कोवासे यांच्याऐवजी जिल्हाध्यक्ष म्हणून महेंद्र ब्राह्मणवाडे यांचीच फेरनिवड करा, अशी मागणी तमाम तालुकाध्यक्ष आणि इतर काही पदाधिकाऱ्यांनी केल्याने काँग्रेसच्या वर्तुळात चांगलीच अस्वस्थता निर्माण झाली आहे. दुसरीकडे नवनियुक्त जिल्हाध्यक्षांच्या बाजुने त्यांचेही समर्थक सरसावले आहेत. आज दुपारी ते आपले म्हणने माध्यमांसमोर मांडणार आहेत.

काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन मनातील असंतोषाला वाट मोकळी करून दिली. ग्रामीण भागातून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठींनी जिल्हाध्यक्ष बदलविण्याचा घेतलेला निर्णय आम्हाला मान्य नसल्याचे सांगत योग्य निर्णय घेण्याची मागणी वरिष्ठांकडे केली. त्यावर चार दिवसात श्रेष्ठींकडून प्रतिसाद मिळाला नाही तर सर्वजण मिळून योग्य तो निर्णय घेऊ, प्रसंगी सामूहिक राजीनामे देण्याची तयारीही असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

महिनाभरापूर्वी संघटन सृजन अभियानांतर्गत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रतिनिधींनी जिल्ह्याचा सविस्तर आढावा घेऊन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मनोगत जाणून घेतले होते. त्यावेळी 90 टक्के पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्यावर विश्वास दाखविला होता, असा दावा पत्रकार परिषदेत पदाधिकाऱ्यांनी केला. शिवाय त्यांच्या कार्यकाळात काँग्रेस पक्षातील मरगळ दूर होऊन पक्षात नवचैतन्य आले, खासदारकीसह आरमोरी क्षेत्रात आमदारकीही काँग्रेसच्या वाट्याला आली. विविध जनआंदोलने झाली. त्यातून पक्षसंघटना बळकट झाली. असे असताना जिल्हाध्यक्षांना बदलविण्याचे काहीच कारण नव्हते, अशी भावना तालुकाध्यक्षांनी व्यक्त केली.

येत्या 26 मे पर्यंत जिल्हाध्यक्षपदाबाबत योग्य निर्णय न झाल्यास आम्ही पदांचा राजीनामा देऊन कार्यकर्ते म्हणून काम करू, असा इशारा तालुकाध्यक्षांनी दिला. या पत्रपरिषदेला माजी जि.प.उपाध्यक्ष जीवन नाट, नगरसेवक सतीश विधाते, वसंत राऊत, मिलिंद खोब्रागडे, प्रमोद भगत, मनोज अग्रवाल, प्रशांत कोराम, राजेंद्र बुल्ले, रमेश गंपावार, प्रमोद गोटेवार, प्रभाकर वासेकर, पप्पू हकीम, सतीश जवाजी, लक्ष्मीकांत बोगामी, दिलीप घोडाम, कल्पना नंदेश्वर, वृंदा गजभिये, कविता उराडे, रिता गोवर्धन आदी पदाधिकारी उपस्थित होते.