Home पब्लिक प्रॉब्लेम हत्ती कॅम्पला येणाऱ्या पर्यटकांना मिळणार आता थंडगार पाणी

हत्ती कॅम्पला येणाऱ्या पर्यटकांना मिळणार आता थंडगार पाणी

कमलापुरात पाणपोईचे लोकार्पण

अहेरी : तालुक्यातील कमलापूर येथील हत्ती कॅम्पला राज्यभरातील आणि राज्याच्या बाहेरील पर्यटक येत असले तरी त्यांच्यासाठी या ठिकाणी साधी पिण्याच्या पाण्याचीही सुविधा नाही. ही अडचण लक्षात घेऊन स्व.रामचंद्र ताटीकोंडावार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी स्वखर्चातून थंडगार पाण्यासाठी ‘पाणपोई’ उभारली. त्याचे लोकार्पण रविवारी आ.धर्मरावबाबा आत्राम यांच्या कन्या व सिनेट सदस्य तनुश्री आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी तनुश्री आत्राम यांनी संतोष ताटीकोंडावार यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत सांगितले की, स्वतःच्या वडिलांच्या स्मृती समाजोपयोगी कार्यातून जपणे ही खऱ्या अर्थाने आदर्श समाजसेवा आहे. कमलापूरसारख्या पर्यटनस्थळी उन्हाळ्यात पर्यटकांना थंड पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणे हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. समाजात अशा सेवाभावी उपक्रमांची गरज असून युवकांनी सामाजिक उत्तरदायित्व स्वीकारून लोकहिताचे कार्य करावे. लोकांच्या गरजा ओळखून त्यासाठी पुढाकार घेणारे संतोष ताटीकोंडावार यांचे कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे, असे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमाला वनपरिक्षेत्र अधिकारी गौरेश गडमाळे, क्षेत्र सहाय्यक पेन्दोर, सामाजिक कार्यकर्त्या सारिका गडपल्लीवार, कमलापूरच्या सरपंच रजनिता मडावी, माजी सरपंच सांबय्या करपेत, माजी पंचायत समिती सदस्य मानतय आत्राम, ग्रामपंचायत सदस्य माया आईला, संतोष बोम्मावार, कैलास कोडापे, स्नेहदीप आत्राम, पूजा येडला, मनोहर रालावंडी यांच्यासह परिसरातील प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी ताटीकोंडावार म्हणाले, “माझ्या वडिलांनी आम्हाला नेहमी समाजसेवेची शिकवण दिली. त्यांच्याच प्रेरणेतून ही पाणपोई सुरू केली आहे. कमलापूर हत्ती कॅम्पला येणाऱ्या पर्यटकांना, विशेषतः लहान मुले व वृद्धांना उन्हातून आल्यानंतर थंडगार पाणी मिळावे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. जलदान हेच श्रेष्ठ दान मानले जाते.”

कमलापूर हत्ती कॅम्प हे जिल्ह्यातील महत्त्वाचे पर्यटनस्थळ असून येथे दररोज मोठ्या संख्येने पर्यटक भेट देतात. उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवत होती. आता ही पाणपोई सुरू झाल्याने पर्यटकांनी समाधान व्यक्त केले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनीही या उपक्रमाचे स्वागत केले.