गडचिरोली : स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर बहुउद्देशीय प्रबोधिनी गडचिरोली यांच्या वतीने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त जाहीर व्याख्यानाचे आयोजन गुरूवारी केले होते. आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांच्या कर्तव्य कक्ष या जनसंपर्क कार्यालयात हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाला माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी प्रमुख वक्ते म्हणून नागपूर येथील प्रसिद्ध व्याख्याते तथा विचारवंत प्रा.लक्ष्मीकांत कारिंगवार यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनकार्यावर अत्यंत अभ्यासपूर्ण आणि प्रभावी मार्गदर्शन केले. स्वातंत्र्यवीरांच्या जीवनातील विविध पैलू उलगडताना ते म्हणाले, “स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अवघ्या 14 व्या वर्षी भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःला अर्पण करण्याची प्रतिज्ञा घेतली होती. त्यांच्या जीवनातील प्रत्येक क्षण हा राष्ट्रसेवा, त्याग आणि संघर्षासाठी वाहिलेला होता. सावरकरांचे जीवन म्हणजे क्रांतीचे धगधगते कुंड असून त्यांचे विचार आजही तरुण पिढीला राष्ट्रभक्तीची प्रेरणा देतात.”
त्यांनी सावरकरांच्या अंदमानातील काळकोठडीतील यातना, स्वातंत्र्यलढ्यातील योगदान आणि त्यांच्या क्रांतिकारी विचारांचा सविस्तर ऊहापोह केला. “देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या या महान व्यक्तिमत्त्वाचे विचार समाजाने आत्मसात करणे हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल,” असेही ते यावेळी म्हणाले.
या व्याख्यान कार्यक्रमाला प्रामुख्याने भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष तथा माजी आमदार डॉ.देवराव होळी, भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव कोहळे, गडचिरोली नगरपरिषदेचे बांधकाम सभापती तथा शहराध्यक्ष अनिल कुनघाडकर, जिल्हा संघचालक घिसुलाल काबरा, भाजपा राज्य परिषद सदस्य डॉ.चंदा कोडवते, जिल्हा उपाध्यक्ष अरुण हरडे, जेष्ठ नेते सुधाकर येनगंदलवार यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रबोधिनीचे अध्यक्ष रमेश भुरसे, सचिव डॉ.भारत खटी, उपाध्यक्ष प्रमोद पिपरे आणि सहसचिव अॅड.निलकंठ भांडेकर यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच प्रबोधिनीचे सदस्य रविंद्र भांडेकर, सुधाकर पेटकर आणि दिलीप मस्के यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
































