Home दैनंदिन बातम्या आरोग्य सेवेचे प्रलंबित प्रस्ताव मार्गी लावण्याचे आयुक्तांचे आश्वासन

आरोग्य सेवेचे प्रलंबित प्रस्ताव मार्गी लावण्याचे आयुक्तांचे आश्वासन

गडचिरोली दौऱ्यात उच्चस्तरीय आढावा

गडचिरोली : जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे शासनस्तरावर प्रलंबित असलेले प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्यात येतील, अशी ग्वाही आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक संजय काटकर यांनी दिली. काटकर यांनी गडचिरोली जिल्ह्याचा दौरा करून जिल्ह्यातील आरोग्य सेवा, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध योजना, मनुष्यबळ, पायाभूत सुविधा तसेच दुर्गम भागातील आरोग्य व्यवस्थेचा सर्वंकष आढावा घेतला. या दौऱ्यात त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठका घेतल्या, तर देसाईगंज (वडसा) तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, कुरुड येथे प्रत्यक्ष भेट देऊन आरोग्य कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी व आशा स्वयंसेविकांशी संवाद साधला. (अधिक बातमी खाली वाचा)

दौऱ्याच्या प्रारंभी आयुक्त संजय काटकर यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र, कुरुड येथे सुरू असलेल्या ‘सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा’ प्रशिक्षण वर्गाची पाहणी केली. प्रशिक्षणार्थींशी थेट संवाद साधून त्यांनी प्रशिक्षणाचा दर्जा, सेवा वितरणातील गुणवत्ता आणि ग्रामीण आरोग्य व्यवस्थेतील आव्हानांची माहिती घेतली. गुणवत्तापूर्ण प्रशिक्षणामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

यानंतर ‘माझं गाव आरोग्यसंपन्न गाव’ या मोहिमेअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धन आणि आरोग्यदायी जीवनशैली यांचा परस्परांशी निकटचा संबंध असून प्रत्येक गाव आरोग्यदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.

आशा स्वयंसेविकांसोबत साधला संवाद

कुरुड येथे आयोजित संवाद कार्यक्रमात आयुक्तांनी आशा स्वयंसेविकांच्या कार्याचा विशेष गौरव केला. ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्यात आशा स्वयंसेविकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगताना ते म्हणाले की, “ग्रामीण व दुर्गम भागात आरोग्य सेवेचा पाया मजबूत ठेवण्याचे कार्य आशा स्वयंसेविका करत असून मानवी जीवनाला अस्तित्वहीन होण्यापासून रोखणाऱ्या त्या खऱ्या रक्षक आहेत.”

यावेळी त्यांनी आशा स्वयंसेविकांना मानधन वेळेवर मिळते का, याची माहिती घेतली. तसेच ‘महा आयडी’ प्रणालीचे महत्त्व समजावून सांगत सर्व लाभार्थ्यांचे महा आयडी लिंकिंग वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. क्षेत्रीय स्तरावरील कर्मचाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सातत्याने मार्गदर्शन व मानसिक बळ द्यावे, असेही त्यांनी सांगितले.

आरोग्य सुविधांवर सविस्तर चर्चा

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील आरोग्य सुविधांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
जिल्हाधिकारी पंडा यांनी जिल्ह्यातील क्षयरोग आणि कुष्ठरोग निर्मूलनासाठी वर्षातून दोन वेळा विशेष शोध मोहिमा राबविण्याचे तसेच दुर्गम भागातील रुग्णांना तातडीने वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी यासाठी अतिरिक्त 108 रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याबरोबरच बाह्यस्रोतामार्फत चालकांची नियुक्ती करण्याची मागणी केली. मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी गडचिरोलीच्या दुर्गम व विस्तीर्ण भौगोलिक परिस्थितीचा विचार करून नागरिकांना 5 किलोमीटरच्या परिघात आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांच्या प्रस्तावांना तातडीने मंजुरी देण्याची मागणी केली. तसेच लवकर निदान केंद्र आणि माता व बाल संगोपन विंग पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी आवश्यक पदभरती आदेश तातडीने निर्गमित करण्याची विनंती केली.

मनुष्यबळ उपलब्धतेवर भर

आरोग्य सेवा नागपूर मंडळाचे उपसंचालक डॉ.शशिकांत शंभरकर यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी परिचर तसेच बाह्यस्रोतामार्फत स्वच्छता सेवक उपलब्ध करून देण्यासाठी तांत्रिक मंजुरीचा प्रस्ताव सादर केला. आयुक्त संजय काटकर यांनी जिल्ह्यातील सर्व मागण्या सकारात्मकतेने ऐकून घेत शासन स्तरावर आवश्यक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

जिल्हा परिषदेत आरोग्य कार्यक्रमांचा आढावा

दौऱ्याच्या पुढील टप्प्यात जिल्हा परिषद येथे आयोजित बैठकीत आयुक्तांनी जिल्हास्तरीय कार्यक्रम समन्वयक, वैद्यकीय अधिकारी आणि विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या अधिकाऱ्यांकडून विभागनिहाय आढावा घेतला. गडचिरोली जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या हिवताप निर्मूलन कार्यक्रमासह इतर राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत शासन स्तरावर प्रलंबित असलेले प्रस्ताव तातडीने निकाली काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व तालुका आरोग्य अधिकारी आणि ग्रामीण रुग्णालयांच्या वैद्यकीय अधीक्षकांशी संवाद साधून दुर्गम भागातील भौगोलिक व प्रशासकीय अडचणी तातडीने सोडविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

या दौऱ्यादरम्यान एचएफडब्ल्यूटीसीचे प्राचार्य डॉ.श्रीराम गोगुलवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.वर्षा लहाडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोष कोटूळे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.माधव शिंदे, वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन हेमके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आनंद ठिकरे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, जिल्हा लेखा व्यवस्थापक, आरोग्य व बांधकाम विभागाचे अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.