गडचिरोली : ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिक तापाच्या उपचारासाठी अनेकदा पारंपरिक पुजारी (भूमिया, पेरमा) यांच्याकडे जात असल्याने उपचारास विलंब होतो. ही बाब लक्षात घेऊन तापाचा रुग्ण तात्काळ शासकीय आरोग्य यंत्रणेकडे पाठविणाऱ्या पारंपरिक पुजाऱ्यांना प्रतिरुग्ण 200 रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे. रुग्णांमधील अंधश्रद्धेचा पगडा दूर करण्यासाठी आरोग्य प्रशासनाने ही तरतूद केली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मलेरिया व डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या आढावा बैठकीत यासंदर्भात चर्चा करण्यात आली. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मलेरिया व डेंग्यू प्रतिबंधासाठी आरोग्य यंत्रणेने अधिक दक्षतेने काम करावे. कोणत्याही व्यक्तीस ताप आढळल्यास त्याची मलेरिया संशयित म्हणून 100 टक्के रक्त तपासणी करण्यात यावी. इतर कारण निश्चित होईपर्यंत तापाच्या प्रत्येक रुग्णाकडे मलेरिया रुग्ण म्हणून पाहून आवश्यक वैद्यकीय उपाययोजना कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.माधुरी किलनाके, तसेच आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय व तालुकास्तरीय वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमार्फत व्यापक जनजागृती करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. आश्रमशाळा व जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना मलेरिया व डेंग्यूची लक्षणे, मच्छरदाणीचा नियमित वापर, स्वच्छतेचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असून ते आपल्या कुटुंबीय व गावकऱ्यांमध्येही जनजागृती करतील. तसेच आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले.
जिल्हाधिकारी पंडा यांनी सांगितले की, रॅपिड डायग्नोस्टिक किट (RDK) चाचणीचा अहवाल नकारात्मक आला तरी संशयित रुग्णांवर आवश्यक वैद्यकीय देखरेख ठेवावी. दुर्गम भागात मलेरिया नियंत्रणासाठी सतर्कता अत्यंत महत्त्वाची आहे. भामरागड तालुक्यातील लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्षेत्रात आढळलेल्या 248 मलेरिया रुग्णांवर वेळेत उपचार करून त्यांना पूर्णपणे बरे करण्यात यश मिळाले असल्याचे त्यांनी नमूद केले.
जिल्ह्यात सध्या अंतर्गत अवशिष्ट कीटकनाशक फवारणी (IRS) मोहीम सुरू असून सुमारे 10 टक्के काम पूर्ण झाले आहे. राज्यस्तरीय तीन विशेष पथके भामरागड, एटापल्ली आणि धानोरा तालुक्यांत कार्यरत आहेत. पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या 93 संवेदनशील गावांमध्ये आवश्यक औषधसाठा, मच्छरदाण्या आणि इतर साहित्याचा पुरवठा करण्यात आला आहे. तसेच आरोग्य सेवक रिक्त असलेल्या 29 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
यावेळी ‘आपदा मित्र’ स्वयंसेवकांना प्राथमिक आरोग्यविषयक प्रशिक्षण देऊन गावांमधील तापग्रस्तांची माहिती संकलित करण्यावर भर देण्यात आला. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांच्या कर्तव्य नियोजनामध्ये समन्वय साधून नागरिकांना 24 तास तज्ज्ञ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
ग्रामीण भागातील आठवडी बाजार, सार्वजनिक ठिकाणे तसेच गोंडी व माडिया भाषांमधील जनजागृती साहित्य, ध्वनिफिती आणि फलकांच्या माध्यमातून मच्छरदाणी वापर, तापाची त्वरित तपासणी आणि वेळेत उपचार याबाबत व्यापक जनजागृती सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाद्वारे बैठकीत देण्यात आली.
































