गडचिरोली : उन्हाळ्यात आणि वर्षभरही अनेक जण मोठ्या आवडीने आईसक्रिम खात असतात. पण अनेकदा ग्राहकांच्या माथी मारले जाणारे हे आईसक्रिम किती निकृष्ट असते याची कल्पना ग्राहकांनाही नसते. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने येथील मे.लक्ष्मी आईस फ्रुट फॅक्टरीवर टाकलेल्या धाडीत आईसक्रिममध्ये वापरले जाणारे निकृष्ट दर्जाचे फ्रोजन डेझर्ट जप्त केले.
धानोरा रोडवरील अन्नपूर्णा हॅाटेलजवळच्या मे.लक्ष्मी आईस फ्रुट फॅक्टरीत तयार होणारे हे फ्रोजन डेझर्ट वापरून तयार केलेल्या आईसक्रिम कोनवर उत्पादन दिनांक किंवा वापरण्याची अंतिम मुदत, उत्पादनाबाबतचा तपशिल असे काहीही नमूद केलेले नव्हते. विशेष म्हणजे हे फ्रोजन डेझर्ट लवकर खराब होणाऱ्या स्वरूपाचा असल्याचे पथकाला आढळून आले. अतिशय अस्वच्छ वातावरणात या पदार्थाची साठवणूक आणि एफडीएच्या नियमांची पूर्तता न करता हा कारखाना चालविल्या जात होता.
यावेळी 9.3 किलो फ्रोजन डेझर्ट जप्त करण्यात आले. त्यातील काही तपासणीसाठी पाठवून उर्वरित नष्ट करण्यात आले. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन आयुक्तांच्या निर्देशानुसार, सहआयुक्त (अन्न) के.आर. जयपूरकर आणि जी.टी. सातकर (सहाय्यक आयुक्त, अन्न, गडचिरोली) यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी जे.एम. कुंजाम आणि अन्न सुरक्षा अधिकारी एस.पी. तोरेम यांनी ही कारवाई केली.
































