Home पब्लिक प्रॉब्लेम अधिकाऱ्यांच्या चमुची हिरापूरला भेट, शाळेवरील बहिष्कार मात्र कायम

अधिकाऱ्यांच्या चमुची हिरापूरला भेट, शाळेवरील बहिष्कार मात्र कायम

गावकऱ्यांच्या भूमिकेमुळे प्रशासनापुढे पेच

गडचिरोली : प्रस्तावित विमानतळासाठी शेतजमिनी जात असलेल्या हिरापूर, गुरवळामधील नागरिकांचा यावर्षीच्या शैक्षणिक सत्रापासून शाळांवर बहिष्कार कायम आहे. आठवडाभरापासून पहिलीपासूनची सर्व मुले शाळेतच गेली नाही. त्यामुळे गावकऱ्यांची समजूत काढण्यासाठी काल वरिष्ठ अधिकारी हिरापूरमध्ये पोहोचले. तुमच्या आंदोलनात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करू नका, आंदोलन आणि शिक्षण हे वेगवेगळे विषय आहेत, असे समजावण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी केला, पण गावकऱ्यांनी आपली भूमिका बदलण्यास नकार दिला.

सहायक जिल्हाधिकारी तथा एसडीओ अरुण एम., सहायक पोलीस अधीक्षक तथा एसडीपीओ अनिकेत हिरडे, तहसीलदार सागर कांबळे, गटविकास अधिकारी अनिकेत पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका आदी अधिकारी गावात पोहोचल्यानंतर नागरिकांची बैठक बोलवण्यात आली. या बैठकीला गावातील महिला-पुरूष उपस्थित होते.

तुमच्या आंदोलनात विद्यार्थी भरडले जाणार नाही याची दक्षता घ्या, त्यांना त्यांच्या शिक्षणाच्या हक्कापासून वंचित ठेवू नका, अशा पद्धतीने समजावण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी केला. मात्र अधिकाऱ्यांच्या विनंतीला नागरिकांनी प्रतिसाद दिला नाही. आपापसात चर्चा केल्यानंतर शाळा बहिष्कार आंदोलन सुरूच ठेवण्याचा सूर गावातील नागरिकांनी आळवला. त्यामुळे आता हा पेच कसा सोडविणार, असा प्रश्न प्रशासनापुढे निर्माण झाला आहे.