गडचिरोली : दबाव टाकून, धमक्या देऊन काम करून घ्यायचे, काम करून घेतेवेळी मोबदला दिल्या जाईल असे सांगायचे, आणि काम झाल्यावर मोबदला देण्यासाठी सतत टाळाटाळ करायची. हा अनुभव अंगणवाडी महिला तसेच आशा वर्करला अनुभवायला मिळत आहे. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता 24 महिने कोरोनाकाळात काम केलेल्या आशांना पाच वर्षाचा कार्यकाळ लोटूनही मोबदला देण्यात आला नाही. त्यामुळे या महिलांनी जिल्हा परिषदेसमोर जोरदार निदर्शने करत लक्ष वेधले.

थकीत कोरोना भत्ता तात्काळ देण्यात यावा या प्रमुख मागणीला घेऊन सिटू संघटनेच्या बॅनरखाली प्रा.रमेशचंद्र दहिवडे, अरुण भेलके, किशोर जामदार, छाया कागदेलवर, अरुण लाटकर, विठाबाई भट्ट, सुनंदा बावणे यांच्या नेतृत्वात अंगणवाडी महिलांचा मोर्चा जिल्हा परिषदेवर धडकला.
प्रास्ताविक भाषणात अमोल मारकवार म्हणाले, हा मोर्चा शासनाच्या फसवेगिरीच्या विरोधात आहे. अंगणवाडी महिलांना पेन्शन देण्यात येईल, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अंगणवाडी महिलांना ग्रॅज्युटी लागू करण्यात येईल, असे लेखी आश्वासन तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्र शासनाने दिले होते. तीन वर्ष लोटूनही त्याची अंमलबजावणी झाली नाही. किशोर जामदार म्हणाले, अंगणवाडी महिलांचे तसेच आशा वर्करचे जुने प्रश्न अजूनही कायम आहे. त्या प्रश्नांची सोडवणूक करण्याऐवजी नवनवीन प्रश्न निर्माण केल्या जात आहे. अंगणवाडी महिलांना गेल्या चार महिन्यापासून केंद्र शासनाचे मानधन देण्यात आले नाही. अशीच परिस्थिती आशा वर्करची देखील आहे. प्रा.दहिवडे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना भेटले व मागण्यांचे निवेदन सादर केले.
या कार्यक्रमासाठी गुलशन शेख, राजश्री खोब्रागडे, माया शेडमाके, ललिता केदार, उज्वला उंदीरवाडे, सुमन तोकलवार, रंजना चौकुंडे, भागीरथा दूधबावरे, रजनी चलकलवार, सिंधू मडावी, भारती रामटेके, विठाबाई भट, सरिता आत्राम, छाया कागदेलवार, विश्रांती डोनाळकर, कौशल्या गौरकार यांनी परिश्रम घेतले.
































